22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरडाळ साठा तपासणीला सोमवारपासून सुरूवात

डाळ साठा तपासणीला सोमवारपासून सुरूवात

लातूर : विनोद उगीले
जिवनावश्यक वस्तुची उपलब्धता व किंमतीत स्थिरता राखण्याचा कायद्या आमलात येऊन तो कागदावरच राहिल्याने दाळ उत्पादनात आघाडीवर असलेल्या लातूरात डाळ उत्पादक व व्यापा-यांनी ‘दाल’ साठवणूकीचा ‘काला’ केल्यानेच आज घडीला तुरदाळ १८० रूपये प्रतिकिलो दरा पर्यंत पोहचली आहे. असे असताना डाळींच्या किरकोळ किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी या डाळींचा साठा करण्यास  केंद्रशासनाने निर्बंध घालत डाळीचा साठा तपासणीचे आदेश देऊन ही जिल्हा पुरवठा विभाग मात्र कागदी घोडे नाचवत हातावर  हात धरून होता. या संदर्भात दैनिक एकमतने ‘महागाईच्या तडक्यामागे डाळ साठवणूकीचा काला!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हा पुरवठा विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यातील डाळींचे आयातदार, मिलर्स, स्टॉकिस्ट्स घाऊक विक्रते त्यांच्या रडारवर आली असून सोमवार पासून जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून डाळसाठा तपासणीला सुरूवात झाली आहे.
 लातूर जिल्ह्याची ओळख डाळींच्या पिकांसाठी आहे. येथे तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूर व उदगीरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतक-यांना पैसे दिले जातात. राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून शेतमाल विक्रीसाठी येतो. तसेच लातूर हे डाळींचे आगार असून येथून संपूर्ण देशभरात डाळींची निर्यात होते. जिल्ह्यातील जवळपास १४० डाळ मिलमधून रोज तीन ते साडेतीन हजार टन डाळ तयार होते. अख्या भारताला इथल्या डाळीचा पुरवठा होतो. ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे. त्यामुळे लातूरला डाळींचे आगार मानले जाते. आता हेच लातूर तुरडाळीचे दर गगणाल भिडत चालल्याने चर्चेत आले आ हे. डाळ उत्पादकांनी व व्यापा-यांनी डाळीचा अनाधिकृत पणे जिल्ह्यातील शकडो वेअर हाऊस मध्ये साठा केल्यानेच तुरडाळीच्या दरात वाढ होत चालल्याचे बोलले जात आहे.
याकडे संबधित महसूल विभागाचे व जिल्हा पुरवठा विभागाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे.  केंद्र  सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कांद्यापाठोपाठ डाळींच्या किरकोळ किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी या डाळींचा ३१ डिसेंबर २०२४ पावेतो साठा करण्यास निर्बंध घालत राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून राज्यातील आयातदार, मिलर्स, स्टॉकिस्ट्स यांच्यासह घाऊक विक्रेत्यांच्या गोदामांची तपासणी करण्याचे आदेश दि. ९ मे रोजी दिले असताना लातूर जिल्हा पुरवठा विभाग मात्र यासंबधी कागदी घोडे नाचवून हातावर हात धरून होता. यासंबधी दैनिक एकमतने लक्ष वेधताच जिल्हापुरवठा विभाग हा खडबडून जागा झाला असून आता जिल्ह्यातीलडाळींचे आयातदार, मिलर्स, स्टॉकिस्ट्स घाऊक विक्रते रडारवर आले असून त्यांच्याकडील डाळसाठा तपासणीला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR