लातूर : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून राहात असल्याने यातून डासांची उत्पत्ती होत आहे. डासांमुळे डेंग्यु तापाने लातूर शहर फणफणले आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या आकडेवारीनूसार डेंग्युचे ६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. खाजगी रुग्णालयांत ही संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात साथीचे आजार वाढतात. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून त्यात डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. जलजन्य आजार वाढत आहेत. पिण्याचे पाणी दुषित होऊन कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, हागवण, विषमज्वर आदींची भीती असते. जलजन्य तसेच साचलेल्या पाण्यात डासांची पैदास झाल्यामुळे डेंग्यु, मलेरिया, चिकनगुण्या या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळेही आजारी पडणा-यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत काळजी घेण्याची गरज आहे.
लातूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. वाहून येणारे पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात जाऊन पाणी दुषित होते. परिणामी जलजन्य आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच सध्या व्हायरल इन्फेक्शनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
आजारी पडणा-यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जलजन्य आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, निर्जंतुकीकरणासाठी मेडिक्लोरचा वापर करावा, बाहेरील असुरक्षित पाणी पिण्यास वापरु नये. कीटकजन्य आजार टाळण्यासाठी साचलेलल्या पाण्याचा त्वरीत निचरा करावा, वापरात नसलेल्या कूलरच्या टाक्या, जुने टायर्स, बकेट, नारळाच्या करवंट्या, छतावरील अडगळ इत्यादीत साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे हे त्वरीत हटवावे, पाण्याच्या सर्व टाक्या, भांडे आठवड्यातून एकदा स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळावा, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत डास घरात प्रवेश करतात. या काळात दारे, खिडक्या बंद ठेवाव्यात, झोपताना मच्छरदानीचा वापर करावा. कोणताही ताप अंगावर काढू नका, ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार
घ्यावेत.