18.4 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeसंपादकीयतिरकीटधा... वाह.. उस्ताद!

तिरकीटधा… वाह.. उस्ताद!

ख्यातनाम कलाकार, तबलावादक, संगीतकार, अभिनेते झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांचे अनेक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य होते. त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्वही घेतलं होतं मात्र, त्यांचं ‘दिल’ हिंदुस्थानीच होतं. त्यांच्या जाण्याने भारतीय आणि जागतिक संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘नाधिनधिन्नाऽऽ’चा नाद थबकला आहे, मुका झाला आहे. आपल्या अद्वितीय शैलीमुळे झाकीर हुसैन ख्यातकीर्त कलाकार झाले. ९ मार्च १९५१ ला झाकीर यांचा जन्म वडील सुप्रसिद्ध तबलावादक अल्ल्लारखाँ आणि आई बावी बेगम यांच्या पोटी झाला.

म्हणजे त्यांना तबलावादनाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांची बोटे तबल्यावर थिरकू लागली. बालपणापासूनच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती; परंतु खेळताना बोटांना इजा होईल म्हणून वडील अल्लारखाँ यांनी त्यांना क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती. झाकीर यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून तबलावादनाचे कार्यक्रम सुरू केले. त्या वेळी त्यांना ५ रुपये मानधन मिळायचे अर्थात त्यांच्यासाठी ५ रुपये मानधन लाखमोलाचे होते. पुढे त्यांना पंडित रवी शंकर, उस्ताद अली अकबर खान, शहनाईवादक बिस्मिल्लाखाँ, पंडित शांताप्रसाद, पंडित किशन महाराज यांचा सहवास लाभला आणि त्यांचे जीवन उजळून निघाले. पंडित शांताप्रसाद आणि पंडित किशन महाराज हे तर तबलावादनाचे चालते बोलते विद्यापीठच होते.

झाकीर यांना त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळाले. संगीत विषयातील डॉक्टरेट ही पदवी त्यांनी वॉशिंग्टनमधील विद्यापीठातून घेतली होती. त्यांचे दरवर्षी साधारणपणे दीडशे कार्यक्रम होत असत. झाकीर हुसैन यांचे शिक्षण मुंबईत माहिमच्या सेंट मायकल हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली. १९७३ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच झाला. सुरुवातीच्या काळात झाकीर हुसेन रेल्वेने प्रवास करायचे. जनरल डब्यातून प्रवास करताना जागा न मिळाल्यास वर्तमानपत्र पसरवून झोपायचे. तबल्याला कोणाचा पाय लागू नये म्हणून तबला पोटाशी धरून ते झोपायचे! झाकीर हुसेन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. अनिसा पदवीधर असून इसाबेला मॅनहरनमध्ये नृत्याचे शिक्षण घेत आहे.

१९७० मध्ये सतारवादक पं. रवीशंकर यांना तबल्याची साथ करण्यासाठी झाकीर अमेरिकेला गेले होते. लहान वयापासूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान, उस्ताद अली अकबर खान, बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, पं. व्ही. जी. जोग, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज अशा अनेक गायक आणि वादकांशी त्यांनी तबल्याची साथसंगत केली. हुसेन यांना दोन भाऊ आहेत. उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्य वादक तर उस्ताद फझल कुरेशी हे तबलावादक आहेत. झाकीर यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण तर २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही देण्यात आला होता. २०१६ मध्ये ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. असा मान मिळणारे झाकीर हुसैन हे पहिले भारतीय संगीतकार होते.

झाकीर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७० मध्ये त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत ‘शक्ती’ फ्युजन ग्रुपची स्थापना केली. भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझच्या मिलाफातून एक नवीन शैली सादर करण्याचे काम या ग्रुपने केले. झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते पैकी ४ वेळा त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. एक तबलावादक असण्यासोबतच ते अभिनेतेदेखील होते. शशी कपूरसोबत त्यांनी ‘हिट अ‍ॅण्ड डस्ट’ या सिनेमात अभिनय केला होता. १२ चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ पदवी प्रदान केली होती. डोक्यावरील घनदाट लांब केस ही झाकीर यांची स्टाईल बनली होती. ताजमहल चहाच्या ‘वाह…ताज’ या जाहिरातीद्वारे झाकीर हुसैन घराघरात पोहोचले. १९९८ साली झाकीर यांनी ‘साज’ चित्रपटात अभिनय केला होता. शबाना आझमीच्या प्रियकराची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांना ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटात सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती; परंतु झाकीरच्या वडिलांना ते मंजूर नव्हते.

आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे, अशी त्यांची इच्छा होती. भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक आयकॉन उस्ताद झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. उच्च रक्तदाबाची व्याधीही त्यांना जडली होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना सॅनफ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच १५ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अभूतपूर्व तबलावादनाद्वारे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकारांना आणि सर्वसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे तबलावादन ऐकून अनेक युवक-युवती तबलावादनाकडे वळले. आता हे दुर्लभ वादन पुन्हा ऐकू येणार नाही. झाकीर हुसैन यांच्या जाण्याने भारताने संगीत क्षेत्रातला तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसैन यांना विनम्र श्रद्धांजली.
अलविदा उस्ताद!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR