26.2 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeराष्ट्रीयदक्षिण अंदमानच्या समुद्रात वादळ धडकणार

दक्षिण अंदमानच्या समुद्रात वादळ धडकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे देशातील अनेक भागांमध्ये हाडे गोठवणारी थंडी पडली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अंदमानच्या समुद्रात ४८ तासांत चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर भारतातही गारठा कायम असून, पुढील एक आठवडा देशभरातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे. काही भागांत दाट धुके पडणार असून, काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात कडक्याची थंडी सुरू आहे. तसेच उत्तर भारतही गारठला आहे. त्यातच बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. आधीच थंडीने नागरिक गारठले आहेत. त्यातच थंडीचे प्रमाण वाढल्यावर नागरिक आणखी हैराण होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार देशात आलेल्या थंडीच्या लाटेची अनेक कारणे आहेत, जसे की पश्चिम-उत्तर भारतामध्ये १२.६ किलोमीटरच्या उंचीवरून तब्बल २७८ किमी प्रतितास वेगाने थंड वारे वाहत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात हिम संकट पाहायला मिळत असून, देशातील हा भाग गारठला आहे. दरम्यान एकीकडे थंडीचे संकट असतानाच आता हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, अनुकूल वातावरणामुळे तो पुढील २४ तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील ४८ तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह उत्तर
भारतात कडाक्याची थंडी
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमध्ये कडक्याची थंडी पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात अतिमुसळधार
दुसरीकडे ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूरमध्ये दाट धुकं पडणार असून, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पाँडेचेरीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR