लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी दलित युवक, विद्यार्थी यांना जातीय मानसिक द्वेषातून हत्या व अत्याचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करीत आम्ही सर्व भीमसैनिकांच्या वतीने दि. ६ ऑगस्ट रोजी येथील महात्मा गांधी चौकात तीन दिवसीय ‘जवाब दो’ धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.
लातूर शहरातील एमआयडीसी येथील विवेकानंद शैक्षणिक संकुल व राजमाता जिजाऊ वस्तीगृहात इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या अरविंद राजाभाऊ खोपे विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू, मयत सायली सिद्धार्थ गायकवाड रा. नायगाव तालुका चाकूर, मयत आकाश व्यंकट सातपुते रा.भुसणी तालुका औसा, सचिन शिवाजी सूर्यवंशी देवणी, विनोद पंढरी कांबळे रा. शिरुर अनंतपाळ, बालाजी शेषेराव कांबळे रा. शिरुर अनंतपाळ. यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात नोंद आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांना दि. ५ ऑगस्ट रोजी देण्यात आले होते. तीन दिवसीय ‘जवाब दो’ धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
गेल्या काहीं महिन्यांत लातूर जिल्ह्यात दलित अन्याय, अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे समाजामध्ये शासन, प्रशासनावर नाराजी व्यक्त केला जात आहे. त्यातच जुनी एमआयडीसीतील ‘जेएसपीएम’ संस्थेच्या वसतीगृहात अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने समाजामधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. दलितांवरील अन्याय, अत्याचार थांबावा, शासन, प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, यासह इतर मागण्या घेऊन ‘आम्ही सर्व भीमसैनिक’रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांची भेट घेवुन त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच मंगळवारी येथील महात्मा गांधी चौकात ‘आम्ही सर्व भीमसैनिक’च्या वतीने तीन दिवसीय ‘जवाब दो’ धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. या आंदोलनादरम्यान चळवळीतील कार्यकर्त्यांसह विविध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होत दलित हत्याकांडाच्या घटनांबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला.