18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यानिमित्त शनिवारी शक्तिप्रदर्शन

दसरा मेळाव्यानिमित्त शनिवारी शक्तिप्रदर्शन

मुंबईत कडेकोट बंदोबस्त, बीडमध्ये मुंडे, जरांगेंकडे लक्ष
मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आले असून, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आझाद मैदान येथे तर ठाकरे गटाचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. या निमित्त दोन्ही शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासोबतच राज ठाकरे यांचाही या निमित्ताने आवाज घुमणार आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवानगडाच्या पायथ्याशी, तर मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे. जरांगे पाटील यांनी यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन केले असून, ते या मेळाव्यात काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या मेळ््याची जय्यत तयारी सुरू असून, राज्यभरातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावणार आहेत. मुंबईत दसरा मेळावे आणि देवी विसर्जन या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी मुंबईत सुमारे १५ हजार पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. बंदोबस्तासाठी ६ अतिरिक्त पोलिस आयुक्त, २७ उपायुक्त, ५४ सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह २३०० पोलिस अधिकारी, १२ हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलिस दलाच्या ३३ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहे.

मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. १०० अधिकारी, ६०० अंमलदार व राज्य राखीव पोलिस दलाच्या ४ प्लाटून शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय आझाद मैदान येथे दक्षिण प्रादेशिक परिमंडळाचे अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दल यांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे.

नारायणगडावर घुमणार
जरांगे यांचा आवाज
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाला सोबत घेऊन लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी यंदा प्रथमच बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नारायणगडाच्या मैदानावर आता जरांगे पाटील यांचा आवाज घुमणार असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR