नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. पूर्व दिल्लीतील जगतपुरी लाल बत्तीजवळ दिल्ली परिवहन मंडळाच्या बसला आग लागली. बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. जीव वाचवण्यासाठी प्रवाशी घाईघाईने बसमधून उतरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून राख झाली आहे.
या आगीनंतर बसमध्ये बसलेल्या लोकांसाठी तिथून बाईकवरुन जाणारी व्यक्ती देवदूत ठरली आहे. बसला आग लागल्याची माहिती बाईकस्वारानेच बसच्या चालकाला दिली, त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
बाईकवरुन जात आलेल्या एका व्यक्तीने बस चालकाला क्लस्टर बसला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाने तात्काळ बस थांबवून आत बसलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते आणि सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.