लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात दिवाळी पाडव्याच्या निमित्त ३५ हजार ८७२ क्विंटल सोयाबीनची बंपर आवक झाली. सोयाबीनच्या आवक बरोबरच दरातही १०० रूपयांची वाढ झाली आसली तरीही शेतक-यांना हमी भावाच्या तुलनेत सरासरी प्रतिक्विंटल मागे ४०० रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
लातूरच्या आडत बाजरात दरवर्षी मोठया प्रमाणात सोयाबीन व इतर शेतमालाची आवक होते. तसेच आवक वाढण्याच्या बरोबरच शेतमालाच्या दरातही वाढ होते. यावर्षीही शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी ३५ हजार ८७२ क्ंिवटल सोयाबनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ५६५ रूपये, सर्वात कमी ३ हजार ९०० रूपये, तर सरासरी ४ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या महिना भरात सोयाबीनच्या दरात १०० रूपयांनी वाढ झाली आहे. केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रूपये प्रमाणे प्रतीक्विंटल हमीभाव जाहिर केला आहे. या हमीभावाच्या तुलनेत ४०० रूपयांची प्रतिक्विंटल शेतक-यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
लातूर जिल्हयात ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. या मध्ये ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ७१ हजार ४७५ हेक्टर, मूग ७ हजार १४१ हेक्टर, उडीद ५ हजार ९४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची काढणी होऊन सध्या या शेतमालाची आडत बाजारात आवक सुरू झाली आहे. मूग, उडीद या शेतमालाचा आपवाद वगळता सोयाबीन या शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे.