लातूर : प्रतिनिधी
पृथ्वीच्या सध्याच्या -हासाला मानवनिर्मित प्रश्न जबाबदार आहेत. यापुढील काळात पर्यावरणाचा समतोल राखत सर्वच घटकांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक आहे. वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता असून यामध्ये पृथ्वीवरील ३३ टक्के भूभाग वनक्षेत्राखाली आणण्यासोबत प्लास्टिकचा वापर बंद करणे, कार्बनचे उत्सर्जन थांबवणे, नद्यांचा संवर्धनाचा कार्यक्रम राबविणे आवश्यक आसल्याचे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कृषि महाविद्यालय लातूर येथे एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि लातूर, कृषि महाविद्यालय, लातूर, बायर क्रॉप सायन्स आणि कोरोमंडल इंटरनॅशनल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एडीएम अॅग्रोचे वाणिज्य विभाग प्रमुख एम. बी. गाजरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रीन वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, प्रा. आश्रुबा जाधव, चिराग बदाला, अमितराज जाधव, शिवाजी गिरी, वृक्ष प्रेमी, सुपर्ण जगताप, डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक गाजरे यांनी उपस्थितांना एक कुटुंब एक वृक्ष हि संकल्पना अवलंबिविण्याचे आवाहन केले. डॉ. लड्डा यांनी मागील १० वर्षात लातूर शहरात झालेल्या वृक्ष लागवड चळवळीचा आढावा घेताना १ लाख ७० हजार वृक्षांची लागण आणि संवर्धन केल्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने लातूर शहराचे तापमान २ ते ३ अंशाने कमी करण्यात यश आल्याचे सांगितले. वृक्ष प्रेमी सुपर्ण जगताप यांनी लातूर जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या देवराई बाबत माहिती देताना वृक्षांवर मानवाप्रमाणे प्रेम करण्याचा संदेश दिला. सदरच्या कार्यक्रमात अमितराज जाधव, शिवाजी गिरी आणि विनोद चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर कृषि महाविद्यालय परिसरात १०० देशी वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आश्रुबा जाधव यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. विजय भामरे यांनी केले. तर आभार डॉ. व्यंकट जगताप यांनी व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्योती देशमुख, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. संतोष कांबळे, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. विनोद शिंदे, डॉ. अजित पुरी आदींनी परिश्रम घेतले.