सोलापूर : जिल्ह्यात एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, मांगी, बोरी व पिंपळगाव ढाळे या मध्यम प्रकल्पांनी आता तळ गाठला आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातही आता ९.२८ टीएमसी उपयुक्त साठा आहे. मृत साठ्यात तब्बल २० टीएमसीपर्यंत गाळच आहे. त्यामुळे संपूर्ण मृतसाठा वापरता येणे अशक्य आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यांसह १००हून अधिक ग्रामपंचायती व काही नगरपालिकांसाठी उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. धरणाच्या बॅकवॉटरला शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होतो. त्यामुळे गतवर्षी २७ डिसेंबरला उजनीतील उपयुक्त पाणीसाठा ५७ टीएमसी होता. तो यंदा अवघा ९ टीएमसी आहे. धरणात ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे, पण त्यामध्ये २० टीएमसीपर्यंत गाळ असल्याने एकूण मृतसाठ्यातील ४३ टीएमसीच पाणी वापरता येवू शकते. त्यातही राष्ट्रीय हरित लवादाच्या निकषांनुसार धरणातील संपूर्ण पाणी उपसा करता येत नाही. जिल्ह्यात सध्या चार टँकर सुरू आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, बार्शी, करमाळा या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्येही अशीच वस्तुस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्चनंतर गंभीर होवू शकतो. शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत उजनीतील पाण्याचे नियोजन कसे होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतीसाठी जानेवारीत आवर्तन सुटणार का, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
ऑक्टोबरमध्ये उजनीतून औज बंधाऱ्यात सोलापूर शहरासाठी पाणी सोडले होते. लिकेज काढून चिंचपूर बंधारा पॅक केल्याचा मोठा फायदा झाला आहे. आता मात्र, १२ ते १५ जानेवारीपर्यंत पाणी पोचायला पाहिजे, असे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे पत्र महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे. त्यानुसार ५ जानेवारी दरम्यान उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. सध्या औज बंधाऱ्यात दीड मीटर पाणी असून साधारणत: १५ दिवस ते पाणी पुरेल, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी दिली.