23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeदेवस्थानांच्या विकासासाठी २७५ कोटी; बीड, जालना, कोल्हापुरात सुशोभिकरण

देवस्थानांच्या विकासासाठी २७५ कोटी; बीड, जालना, कोल्हापुरात सुशोभिकरण

अरणला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार

मुंबई : वृत्तसंस्था
श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

या विकास आराखड्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र, देवस्थान विकास शिखर समितीची बैठक आज (गुरूवारी) मंत्रालयात पार पडली. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यंदाचे वर्ष हे श्री चक्रधर स्वामींचे अष्टशताब्दी जन्मोत्सव वर्ष आहे. तसेच आज त्यांची जयंती आहे, यानिमित्ताने महानुभाव पंथाच्या देवस्थानांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भक्तीधाम प्रल्हादपूर येथील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, यासाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच संत सावता माळी यांचे गाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

– श्री क्षेत्र रिद्धपूर, ता. मोर्शी, जि. अमरावती (२५ कोटी)
– श्री क्षेत्र पांचाळेश्वर ता. गेवराई, जिल्हा बीड (७.९० कोटी)
– श्री क्षेत्र पोहीचा देव, कोळवाडी, ता. जि. बीड (४.५४ कोटी)
– श्री जाळीचा देव, ता. भोकरदन, जिल्हा जालना (२३.९९ कोटी)
– श्री गोविंद प्रभू देवस्थान, भिष्णूर, ता. आष्टी, जिल्हा वर्धा (१८ कोटी)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR