16.8 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रदोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज

बारामती : प्रतिनिधी
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते, त्यामुळे एकत्र राहणे महत्वाचे राहिल असे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, काल १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

दरम्यान, आता मुलाखतीत सुनंदा पवार यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, मी या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणून पाहत आहे. कारण काल पवार यांच्यासाठी महत्वाचा दिवस होता. काल त्यांचा ८५ वा वाढदिवस होता. काल सगळे शुभेच्छा देण्यासाठी तिकडे गेले होते. ही भेट राजकीय आहे का हे मला सांगता येणार नाही, असंही सुनंदा पवार म्हणाल्या.

“कसंही वागले तरीही टीका होत असते. अजित पवार कुठेही गेले तरीही बातम्या होत असतात. ‘दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतील का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाल्या, यावर काही सांगता येणार नाही. कुटुंबात मतभेद असतातच, मतभेद मिटतील. भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.
“पक्षातील नवे उमदे आमदार निवडून आले आहेत त्यांना जर पक्षाची, संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष पुन्हा वाढेल, असंही पवार म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR