लातूर : प्रतिनिधी
धनगर समाजास कायद्याने दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटूंबियांना दिलेले धनगड जात प्रमाणपत्र रद्द करावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी दि. २८ जूनपासून येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात दोन तरुण बेमुदत उपोषण करीत आहेत. दि. ६ जुलै रोजी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. धनगर समाजाच्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याकरीता धनगर समाजाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर हलगी निनाद करण्यात आला.
धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर हे दोन तरुण दि. २८ जूनपासून येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला लातूर, नांदेड, बीड, धाराशिव जिल्ह्यातील असंख्य समाज बांधवांनी उपोषणस्थळी येऊन पाठींबा दिला आहे. धनगर समाजाच्या वतीनेही विविध स्वरुपाची आंदोलने केली जात आहे. दि. ४ जुलै रोजी पु. अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको करण्यात आला.
६ जुलै रोजी जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर हलगी निनाद करण्यात आला. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या घरासमोर हलगी निनाद करण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्वत: येऊन धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी आपण संसदेत आवाज उठवू, अशी हमी त्यांनी दिली. हलगी निनादादरम्यान जे आमदार घरी होते त्यांनी तसेच जे आमदार घरी नव्हते त्यांच्या प्रतिनिधींनी हलगी निनादादरम्यान धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.