22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeधाराशिवधाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज

धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज

 अप्पर पोलिस अधीक्षक करणार लाठीचार्जची चौकशी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी दि. १४ मे रोजी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमीं कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे धाराशिव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी या लाठीचार्ज प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मंगळवारी दि. १४ रोजी धाराशिव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी शहरातून विविध गल्लीतील विविध मंडळाच्या २२ मिरवणुका निघाल्या होत्या. पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी दिली व डीजे लावण्यास परवानगी नाकारली होती. धाराशिव शहरातील संघमित्र मंडळाची मिरवणूक डीजेच्या मोठ्या आवाजात सुरू होती.

याबाबत तेथील नागरिकांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलीस ठाण्याचे अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मिरवणूक थांबविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी संभाजी महाराजांची मुर्ती रस्त्यावर ठेवली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलीसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यामुळे धाराशिव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी दि. १५ रोजी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन लाठीचार्ज करण्याचे आदेश देणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR