29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसंपादकीय विशेषधावांची बरसात होईल?

धावांची बरसात होईल?

क्रिकेटच्या इतिहासात आजवर असंख्य बदल होत गेले आणि त्यातून या सामन्याला एका बाजूने शिस्तीचे कोंदण देतानाच दुस-या बाजूला त्यातील रंजकता, उत्कंठा, रोमहर्षकपणा कसा वाढत जाईल याचा विचार केला गेला.  टी-२०ची भन्नाट संकल्पना अवतरल्यानंतर क्रिकेटमधील रंजकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचतानाच लोकप्रियतेनेही कळस गाठला. दरम्यानच्या काळात पॉवर प्ले, फ्री हिट यांसारख्या नियम आणि अभिनव प्रयोगांनीही क्रिकेट प्रेक्षकांना अधिकाधिक आनंद कसा मिळेल याची तजवीज केली. अशाच प्रकारचे काही बदल आता होऊ घातले असून त्याबाबत आयसीसीकडे प्रस्तावही दिला गेल्याचे समजते. त्यातील एक प्रस्ताव म्हणजे १०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून  षटकार लगावल्यास त्याबदल्यात सहाऐवजी १२ धावा दिल्या जाणार आहेत. केविन पीटरसनने केलेल्या या मागणीला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अनुकूलता दर्शवली आहे. या प्रस्तावाला संमती मिळाल्यास क्रिकेटच्या मैदानावर धावांची आतषबाजी होताना दिसणार आहे.
टलमन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणा-या क्रिकेटला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. फ्रेंच भाषेतील क्रॉक्युट या शब्दापासून क्रिकेट या शब्दाची उत्पत्ती झाली असे सांगितले जाते. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी दक्षिण पूर्व इंग्लंडमधील वेल्ड येथे राहणा-या मुलांकडून हा खेळ खेळला जात होता. १६११ मध्ये त्याला खेळप्रकार म्हणून प्रमाणित करण्यात आले. १७४४ हे वर्ष क्रिकेटच्या या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. कारण यावर्षी प्रथमच या क्रीडाप्रकाराला नियमांचे कोंदण लाभले. अठराव्या शतकापासून क्रिकेट हा ब्रिटनचा प्रमुख खेळ बनला. १८४४ मध्ये सर्वांत पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यादरम्यान खेळला गेला. पुढे १८९० मध्ये पहिल्यांदा काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपची औपचारिकरीत्या स्थापना करण्यात आली. १८८९ मध्ये एका षटकामध्ये चार चेंडूंऐवजी पाच चेंडू असतील, असा बदल करण्यात आला. १९००  सालापासून सहा चेंडूंचे एक षटक बनले. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया  कंपनीच्या आगमनानंतर क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. २५ जून १९३२ रोजी भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडमधील लॉर्डस्च्या मैदानावर  आपला पहिला कसोटी सामना खेळला; तर १३ जुलै १९७४ रोजी लीडस्मध्ये इंग्लंडविरोधात भारतीय संघ पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला. स्वातंत्र्यानंतर क्रिकेटविषयीची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली आणि भारतीय उपखंडातील सर्वाधिक क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून आपण ‘नावलौकिक’ मिळवला.
क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यांना खूप मोठा प्रेक्षकवर्ग होता. सलग पाच दिवस संपूर्ण सामना पाहणारे लाखो भारतीय आजही आहेत. तथापि, पूर्वीच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. याचे कारण ज्याप्रकारे जीवनशैलीला वेग येत गेला तसतसे क्रिकेटमध्येही बदल होत गेले. ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांकडे क्रिकेटरसिकांचा ओढा वाढू लागला; परंतु टी-२०च्या उदयानंतर क्रिकेटचे सर्व आयामच बदलून गेले. भारताचा विचार करता ललित मोदी यांनी आयपीएलच्या माध्यमातून   क्रिकेटविश्वात केवळ अर्थकारणाचा प्रवाहच खुळखुळता केला नाही तर क्रिकेटरसिकांची अभिरुचीच बदलून टाकली. क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत महत्त्वपूर्ण घटनांपैकी आयपीएल ही एक स्पर्धा आहे. टी-२० क्रिकेट आयपीएलच्या आधी सुरू झाले. पण, आयपीएलमुळे टी-२० ला खरे महत्त्व प्राप्त झाले. आज बहुतेक सर्व देशांतील क्रिकेट प्रशंसक आयपीएल सामने कधी आहेत हे लक्षात घेऊन आपल्या कॅलेंडरनुसार कार्यक्रमांच्या नोंदी ठरवतात, अशी स्थिती आहे.२० षटकांच्या सामन्यांमुळे क्रिकेटमधील रंजकता, उत्कंठा शिगेला पोहोचू लागली. परिणामी याचे रंजक मूल्यही वाढत गेले. धावांचे डोंगर उभे राहू लागले. पूर्वी एकदिवसीय सामन्यातील ५० षटकांमध्ये २५० ची धावसंख्या खूप मोठी वाटायची; पण आता अवघ्या २० षटकांमध्ये ४०० धावांचा मेरूपर्वत लीलया उभे करणारे फलंदाज आणि संघ अस्तित्वात आले. पॉवर प्ले, फ्री हिट यांसारख्या संकल्पनांमुळे क्रिकेटमधील रंजकता आणखी वाढत गेली.
साधारणत: १९७५ ते १९८४ या काळात कसोटी तसेच एकदिवसीय मालिका यांचे प्रमाण अत्यंत मर्यादित होते.  १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात एकदिवसीय क्रिकेटचे फॅड जगभर वाढत गेले. आज टी-२० सामन्यांमुळे कसोटी सामने हवेत कशाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण क्रिकेटरसिकांना आता थ्रील, टोकाची उत्कंठा, जबरदस्त चुरस या सर्वांची सवय लागली आहे. तशातच आता क्रिकेटमध्ये सुचवण्यात आलेल्या नव्या प्रस्तावाला संमती मिळाल्यास क्रिकेटरसिकांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अलीकडेच काही नव्या बदलांसंदर्भात शिफारसी करणारे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव अतिशय भन्नाट आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने सुचवलेल्या या प्रस्तावानुसार क्रिकेट सामन्यामध्ये एखाद्या फलंदाजाने १०० मीटरहून अधिक लांब षटकार ठोकल्यास त्याला कमीत कमी १२ धावा दिल्या जाव्यात. पीटरसनने जाहीरपणाने ही बाब यापूर्वीही काही वेळा मांडली होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू पीटरसनच्या या मताशी सहमत आहेत. वास्तविक पाहता, बेजबॉलच्या युगामध्ये १०० मीटर लांब षटकार हा काहीसा दुर्मिळ झाला आहे.
टी-२० सामन्यांमध्येच असा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो. आपल्याकडे छोट्याशा गल्ल्यांमध्ये लहानपणी क्रिकेट खेळणा-यांना आठवत असेल की, एका विशिष्ट अंतरापलीकडे चेंडू गेल्यास सहापेक्षा अधिक रन मिळतील असा गमतीशीर नियम ठरवला जायचा. कारण इतक्या लांबपर्यंत चेंडू जाणारच नाही अशी शक्यता त्यामागे असायची. पण एखादा मोठ्या वयोगटातील, अंगकाठी मजबूत असणारा, कसलेला फलंदाज आला की तो या शक्यता मोडीत काढायचा. तशाच प्रकारे क्रिकेटच्या मैदानातही अनेक महारथींनी स्टेडियमबाहेर चेंडू फटकावल्याची उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष मैदानात किंवा टीव्हीच्या पडद्यावर असा षटकार पाहताना प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन होते. अर्थातच असा उत्तुंग षटकार ठोकण्यामागे प्रचंड कौशल्य, अचूकता आणि ताकदीबरोबरच तंत्रही फलंदाजाला अवगत असणे गरजेचे असते. बरेचदा असा प्रयत्न अयशस्वी ठरून फलंदाज बाद झाल्याचेही  दिसले आहे. पण तरीही आपल्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी फलंदाज असे साहस करतात. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आजवरचा सर्वांत लांबवरचा षटकार ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदीच्या नावावर नोंदवला गेलेला आहे.
२०१३ मध्ये जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने १५८ मीटर लांब षटकार ठोकला होता. त्याखालोखाल ब्रेट ली (१३० मीटर), मार्टिन गुपटिल १२७ मीटर, लियाम लिव्हिंगस्टोन  १२२ मीटर, कॉरी अँडरसन १२२ मीटर, मार्क वॉ १२० मीटर, युवराज सिंग ११९ मीटर आणि महेंद्रसिंग धोनी ११८ मीटर अशी क्रमवारी आहे. इतक्या अथक प्रयत्नांनी दूरवर लांब षटकार ठोकूनही फलंदाजाच्या आणि संघाच्या खात्यात फक्त सहाच धावा मिळतात, ही बाब योग्य नाही असा काहीसा विचार १२ धावांची मागणी करणा-यांच्या मनात असावा. तो चुकीचा म्हणता येणार नाही. पण यामध्ये एक पेच आहे. तो म्हणजे अशा प्रकारच्या षटकारांचे अचूक मोजमाप करण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध असले तरी ते परिपूर्ण नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. गोल्फ खेळामध्ये  ते उपलब्ध आहे. दुसरीकडे, काहींच्या मते सध्याचे तंत्रज्ञान अचूकपणाने हे अंतर मोजू शकते. याचा वापर करून नवा प्रस्ताव स्वीकारण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. काही खेळाडूंच्या मते सहा धावांवरून एकदम १२ धावांवर उडी घेणे थोडे अतिशयोक्तीचे ठरेल. त्याऐवजी अशा उत्तुंग षटकाराप्रीत्यर्थ ८ धावा देणे योग्य ठरतील. रोहित शर्माच्या मते, ८० मीटर अंतरावरील फटक्यासाठी ६ धावा आणि १०० मीटरहून अधिक फटक्यासाठीही तितक्याच धावा हा फलंदाजांवर अन्याय आहे.
काही काळापूर्वी समालोचकांच्या पातळीवर असणारी चर्चा आता आयसीसीकडे प्रस्ताव म्हणून सादर करण्यात आली असून लवकरच तिला मान्यता मिळू शकते. तसे झाल्यास क्रिकेटच्या मैदानावर उत्तुंग षटकारांचा  वर्षाव होताना रसिकांना पाहायला मिळू शकतो. सद्यस्थितीत १०० मीटर किंवा त्याहून अधिक लांबीचे षटकार फारसे दिसत नाहीत. दोन महिने चालणा-या आयपीएल स्पर्धांमध्ये १०० मीटरहून अधिक लांबीचे जेमतेम १० षटकार पाहायला मिळतात. पण १२ धावा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात आला तर फलंदाजांमध्ये यासाठीची अहमहमिका लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. दुसरीकडे गोलंदाजांसाठी मात्र ही बाब चिंता वाढवणारी ठरेल. कारण यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभी करणे सहजशक्य होणार आहे. पण यॉर्कर, रिव्हर्स स्विंग यांसारख्या तंत्रांचा वापर करून अशा प्रकारचा प्रयत्न करणा-या फलंदाजांच्या यष्टी उडवण्याचे कसब असल्यास गोलंदाजांना घाबरण्याचे कारण नाही ! एकंदरीत हा निर्णय क्रिकेटमधील घमाशान वाढवणारा ठरेल यात शंका नाही! पाहूया..
-नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR