नंदुरबार : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच नंदुरबारमध्ये सत्ताधारी भाजपला चांगलाच दणका बसणार अशी चर्चा सुरू आहे. येथील शहादा तळोदाचे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले आहे.
यामुळे काँग्रेस पक्षाला परत चांगले दिवस येणार असे चित्र निर्माण झाल्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. नंदुरबारच्या शहादा येथेही अशीच स्थिती आहे.
दरम्यान, शहादा तळोदाचे आमदार राजेश पाडवी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन आपण भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे सांगितले आहे. मात्र असे असले तरी पाडवी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या नंदुरबार जिल्ह्यात चांगल्याच रंगल्या आहेत. सूत्रांच्या मते, राजेश पाडवी यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चा आमच्या पक्षातील काही लोकांनी उपस्थित केल्या आहेत.
मला पक्षाने अनेक संधी दिल्या आहेत आणि या संधीचा मी फायदा देखील पक्षाला करून दिला आहे. मी शेवटपर्यंत भाजप सोडून कुठेही जाणार नाही. आमच्या पक्षातील काही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या लोकांकडून या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र मी भाजप सोडणार नाही, असे आमदार पाडवी म्हणाले.