22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

नंदुरबारमध्ये काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

नंदुरबार :नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित यांच्यासमोर यावेळी तगडे आव्हान होतं.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी हे आव्हान दिलं होतं. सुरुवातीला काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबारमध्ये भाजपने सलग दोनवेळा सत्ता मिळवली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र पालटलेलं दिसत आहे. गोवाल पाडवी यांनी नंदुरबारमध्ये आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चत असल्याचे मानलं जात आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या हिना गावित पिछडीवर आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ना गावित यांंना मतमोजणीत सुरूवातीपासूनच धक्का बसला असून, पहिल्या फेरीपासून आघाडी टिकवीत काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी आठव्या फेरी अखेर एक लाख पाच हजार मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीतच काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत काँग्रेसने ३२ हजारांची आघाडी घेतली. ती मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत वाढत गेली. आठव्या फेरी अखेर ही आघाडी एक लाख पाच हजार मतांची झाली आहे. मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या होणार आहे. काँग्रेसने लाखाची आघाडी घेताच विजयाचा जल्लोष सुरू केला असून, ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होत आहे.

नंदुरबार हा मतदारसंघ १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले आणि हिना गावीत दोनवेळा इथून निवडून आल्या. काँग्रेसने के. सी. पाडवी यांचे पुत्र आणि फारसे परिचयात नसलेल्या गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती. मात्र सुरुवातीपासूनच गांधी परिवाराविषयी अजूनही सहानुभूती बाळगणारा मतदार अद्यापही नंदुरबारमध्ये असल्याने यंदा त्याचा फायदा गोवाल पाडवी यांना नक्कीच झालेला दिसतोय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR