मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांच्याविरोधात ईडीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
ईडीने याचिकेमध्ये नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वीच अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. तेव्हापासून ते तुरुंगातून बाहेर आहेत. काही काळ त्यांनी रुग्णालयात उपचारही घेतले.
मलिक हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ईडीने यावरच आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय जामीन मिळालेला असताना ते त्याचा गैरवापर करत असल्याचा दावा करत ईडीने जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. मलिकांनी मुंबई हायकोर्टात यापूर्वीच नियमित जामिनासाठी याचिका दाखल केलेली आहे. त्यावर अद्याप कोर्टाने निकाल दिलेला नाही.
हा निकाल लागेपर्यंत मलिकांना अंतरिम वैद्यकीय जामीन असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आता ईडीने जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्याने मलिकांच्या अडचणी वाढू शकतात. आता यावर कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मलिकांच्या उमेदवारीवर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
भाजप आणि शिवसेनेने मलिकांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. तसेच अणुशक्तीनगर येथे मलिकांच्या कन्या सना मलिक राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. त्यांचाही प्रचार करणार नसल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे. तर अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दोन्ही उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघांतील निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.