मुंबई : मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या काही चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी करतात मात्र त्यानंतर अचानक सिनेसृष्टीतून गायब होतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मिताली जगताप. ‘वादळवाट’, ‘एक धागा सुखाचा’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मिताली २०१२ नंतर अभिनय क्षेत्रातून गायब झाली. तिने ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.
मात्र त्यानंतर तिने सगळ्यातून काढता पाय घेतला. आता ती पुन्हा एकदा कलर्स मराठीच्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत दिसतेय. त्यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एक खंत व्यक्त केली आहे.
मितालीने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगितला. आपल्याला विचारणा तर झाली होती मात्र आपण ती संधी गमावल्याचे आजही वाईट वाटते असं ती म्हणाली.
याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘२०१२ पासून माझ्या मनात एक गोष्ट आहे. मला त्याबद्दल कायम वाईट वाटत आले आहे. एक सुंदर अशी कलाकृती होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची होती. पण मी काही वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. अगदी उद्या चित्रीकरण आहे आणि आदल्या रात्री मी नाही येऊ शकत असे सांगितले. कारण माझी मुलगी आजारी होती.
मिताली पुढे म्हणाली, जर ती एक कलाकृती मी केली असती तर माझ्या आयुष्यात खूप काही झाले असते. आताची पिढी ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे. मी संभाजी नगरसारख्या शहरातून मुंबईत एकटी आले. खूप कष्ट करुन मी स्वत: स्थान निर्माण केले. लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक सोनेरी काळ आला. तो म्हणजे मी आई झाले. एक कलाकार म्हणून मी या गोष्टीला भारावून जायला नको होतं जे मी गेले. माझ्यासाठी माझी लेक पहिलं प्राधान्य आहे. ज्यावेळी असे वाटले की त्या छोट्याशा जीवाला माझी गरज आहे तेव्हा मी कसलाच विचार केला नाही.
तिने पुढे सांगितले माझा नवराही याच क्षेत्रात आहे. आम्हीच सकाळी ७ ला घर सोडले तर रात्री ११ ला घरी येणार. त्यामुळे माझं इतकंच म्हणणे होते की, आम्हा दोघांपैकी एकाचा चेहरा तरी तिला दिसावा. अशावेळी मी नव-याला म्हटले की तू कर मी ब्रेक घेते. ज्यावेळी तिला माझी गरज पडली तेव्हा मी तिच्याबरोबर होते त्यामुळे करिअरमधील एक संधी मला सोडावी लागली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अशावेळी बरंच काही शिकायला मिळते.