लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. १४ डिसेंबर रोजी ग्राम स्वराज लातूरच्या वतीने अनिल दांडेकर लिखीत व अर्पणा गोवंडे दिग्दर्शित ‘खेळ’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. या रहस्यमय नाटकाने नाट्यरसिकांचा अक्षरश: श्वास रोखला.
जुन्या काळातील अभिनेत्री मधुमिता उर्फ कावेरी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल होते. त्याचा शोध घेण्यासाठी सब इन्सपेक्टर रावराणे मधुमिताच्या घरी येतात. तिथे त्यांची भेट तिचे पती चिंतामणी पाडाळे यांच्याशी होते. मधुमिता बेपत्ता होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. तेव्हा त्यांना हे प्रकरण बरंच गुंतागुंतीच आहे, हे जाणवू लागतं. तिथेच त्यांना मधुमिताची मावशी भेटते आणि गुंता आणखीनच वाढत जातो. चिंतामणी पाडोळेंचे वागणे, त्यांना रावराणेबद्दल मिळालेली माहिती यामुळे गुढ आणखीनच वाढत जाते आणि कथानकाला कलाटणी मिळते.
मानवी मनाची गुंतागुंत ही अनाकलनीय आहे. मन म्हणजे एक फार मोठे गुढ आहे. आपण त्याचा जितका शोध घेऊ तितके ते कळेनासे होते. माणसाचे वागणे हे त्याला येणा-या अनुभवांवर आधारित अस्ते. त्याच्या या वागण्याचा त्याच्या भोवतालच्या लोकांवर विपरीत परिणाम व्हायला लागला की, त्यातून बाहेर काढणे गरजेचे होऊन बसते. हे करण्यासाठी माणसाला धीटपणा आणि शहाणीव आवश्यक असते. त्यामूळे जगणे सुस आणि सुकर होते, हे अधोरेखीत करणारे दोन अंकी रहस्यमय नाटक म्हणजे ‘खेळ’.
तीन पात्री ‘खेळ’ या रहस्यमय नाटकाने नाट्यरसिकांना चांगलेच खिळवून ठेवले. चिंतामणी पाडाळे (डॉ. गणेश प्रधान पोतदार), सब इन्सपेक्टर सत्यजित रावराणे (अमोल गोवंडे) आणि कावेरी उर्फ मधुमिता आणि मावशी (अपर्णा गोवंडे) या तिन्ही कलावंतांनी कसदार अभिनय केला. लांब पल्ल्यांचा संवाद, शब्दांवर पकड, संवादानूसार शारिरीक हालचाली या सर्व गोष्टी या कलावंतांत होत्या. अभिनेत्री मधुमिताची व्यक्तीरेखा आणि मावशीची व्यक्तीरेखा साकारताना अर्पणा गोवंडे यांनी जे बेरींग पकडले होते ते अफलातून होते. या दोन्ही भुमिका त्यांनी खुप चांगल्या पद्धतीने वठवल्या.
नाटकाचे दिग्दर्शक म्हणूनही अर्पणा गोवंडे यांनी चुनूक दाखवून दिली. संहितेला अभिप्रेत लहान-लहान गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेले दिसले. बारकाईने दिग्दर्शन केल्याचे जाणवले. विवेक मगर यांचे नेपथ्य अतिश्य उत्तम होते. दयानंद सरपाळे यांचे संगीतसंयोजन नाटकाच्या रहस्यात आणखी भर टाकत होते. मनिषा टोपरे, दयानंद सरपाळे यांची रंगभूषा ब-यापैकी होती. संगीता लातूरे, सुरेंद्र अपसिंगेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी छान सांभाळली. टिमवर्क उत्तम होते.