सावंतवाडी : प्रतिनिधी
देवकार्य, लग्न समारंभ, जेवणासाठी लागणा-या श्रीफळ (नारळ) ने चाळीशी पार केली आहे. महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला बसत असताना नारळाचे दरही वाढले आहेत. हवामान बदलाचा परिणाम फळबागांना बसत आहे तसाच नारळाच्या झाडांनाही फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे.
दरम्यान, नारळाचे प्रतिनग दर २० ते ५० रुपये झाल्याने ग्राहकांच्या खिशाला आर्थिक चटका बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे दर चाळीशी पार पोहोचले असून हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने रोजच्या जेवणातील नारळाचा वापर आता काहीसा कमी होताना दिसत आहे. नारळ उत्पादनात कमालीची झालेली घट तसेच नारळाला असलेली मागणी पाहता नारळाचे दर वाढल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेली कित्येक वर्षे मोठ्या प्रमाणात याठिकाणी नारळाचे उत्पादन घेतले जाते. नारळाच्या उत्पादनासोबतच या ठिकाणी सुपारी, काजू, आंबा आदी उत्पादनातून येथील शेतकरी बागायतदार आपली रोजीरोटी भागवत आहेत.
गेल्या काही वर्षांत नारळाचे दर कमी-जास्त होताना पाहायला मिळत आहेत. निसर्गचक्र बदलत आहे. बदलते हवामान, असंतुलित पाऊस आणि कीड-रोगाचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता. गेल्या काही वर्षांत नारळाचे उत्पादन निम्यावर येऊन ठेपले आहे. बदलते वातावरणच नारळाच्या उत्पादनाला मारक ठरले आहे. एकूणच याचा परिणाम नारळाच्या दरावर दिसून आला आहे, असे बागायतदारांचे मत आहे.