22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केजरीवाल यांना अटक

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केजरीवाल यांना अटक

पुणे : प्रतिनिधी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांनी उघडपणे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांची अटक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून, ‘केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबत आहे. यापूर्वी असे कधीही घडलेले नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल चिंता वाटत आहे. आधी सोरेन यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर आता केजरीवालांना बेड्या घालण्यात आल्या आहेत. उद्या अजून कोणाला अटक होईल, धोरण ठरवलं म्हणून अटक करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असेही शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे शरद पवारांबरोबरच त्यांची खासदार कन्या सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणावरून सत्ताधा-यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही या विषयावरून सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडले आहे.

राजकीय हेतूने प्रेरित अटक : सुप्रिया सुळे
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनीही केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. ‘मी या प्रसंगी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर उभी आहे. ही राजकीय हेतूने प्रेरित अटक आहे. ईडीने ही अटक विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मतदारांना कमी लेखण्याच्या उद्देशाने भाजप सरकारच्या आदेशानुसार केली आहे. आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी या लढ्यात एकत्र आहोत, असे सुप्रिया यांनी म्हटले आहे.

भाजपा घाबरलीय : रोहित पवार

शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही या अटकेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजपा सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल. या काळात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे. या कारवाईवरून मात्र एक स्पष्ट झाली की, भाजपा घाबरलीय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी, ‘लडेंगे और जितेंगे’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR