मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शंखनाद’ या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असे त्यांना म्हणायचे होते. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झाला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज महायुतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांचे रिपोर्टकार्ड सादर केले. एवढेच नाही तर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, खुर्ची हे आमचे लक्ष्य नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक एकीकडे म्हणत आहेत की राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि वर घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यावर ते संपूर्ण कर्जमाफी करणार आणि इतरही अनेक घोषणा करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की सरकारकडे योजनांसाठी पैसे आहेत की नाहीत? पैसे असतील तर ते पुढची कर्जमाफी करू शकतील. मात्र, आम्ही ज्या योजना आतापर्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभे करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असणार आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगा?
महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले आहे. फडणवीस म्हणाले, सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वत:च इथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझे शरद पवारांना खुले आव्हान आहे शरद पवारांनी तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगा? असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.