सोलापूर : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या ‘नीट-२०२४’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची ‘सीबीआय’ मार्फत चौकशी करून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने समन्वयक माउली पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शहर व जिल्ह्यातील आमची मुले १२ वी परीक्षेनंतर गेल्या दोन वर्षांपासून ‘नीट’ परीक्षेचा अभ्यास केला आहे. वेळ व पैसा गेला आहे, विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. असे असताना शासनाकडून नेमण्यात आलेल्या ‘एनटीए’ या संस्थेमार्फत मोठा घोटाळा झाला आहे. निष्पाप विद्यार्थी यामध्ये भरडले गेले आहेत. या घोटाळ्यामुळे मोठा परिणाम होणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी सुप्रीम कोर्टाच्यानिवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात यावी.
परीक्षेसाठी देशातून २४ लाख तर महाराष्ट्रातून दोन लाख ८० हजार विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघत असताना, ‘एनटीए’ या संस्थेने मोठा अन्याय केला आहे. १४ जून २०२४ रोजी निकाल होता, मात्र लोकसभा निकालाच्या दिवशीच १० दिवस अगोदर ‘नीट’चा निकाल लावून ‘एनटीए’ने घोटाळा गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे.
७२० पैकी ७२० गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६७ आहे, मात्र असे यापूर्वी कधीच झाले नाही. ग्रेस मार्क हे १५६३ विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. असे गुण देण्याची पद्धत मेडिकल व इंजिनीअरिंगसाठी लागू होत नाही. त्यामुळे याची ‘सीबीआय’ मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.