25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडानीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक

नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक

पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलेच रौप्य पदक
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरुवार, दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तब्बल ९२.९७ मीटरचा थ्रो करून नवा विक्रम प्रस्थापित करीत सुवर्ण कमाई केली. पाकिस्तानचे या ऑलिम्पिकमधील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. दरम्यान, नीरज चोप्राला यावेळी सुवर्ण संधी होती. परंतु त्याला आपला करिश्मा दाखविता आला नाही. त्याने यावेळी ८९.४५ मीटरचा थ्रो करून दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिलेच रौप्य पदक आहे.

जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर अंतर पार करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कमाई करणा-या नीरजने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये आठव्या क्रमांकवर भालाफेक केली. यावेळीही त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. परंतु या आशेवर पाणी फेरले गेले असले तरी रौप्य कमाई केल्याने भारताच्या खात्यात आणखी एक पदक नोंदले गेले. त्यामुळे भारताच्या पदकाची संख्या ५ वर पोहोचली आहे. या अगोदर आजच हॉकी संघाने कांस्य पदक मिळवून दिले. त्यामुळे आजच्या दिवसातील हे दुसरे पदक ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले होते.

पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुस-या प्रयत्नात ८९.४५ मीटर थ्रो केला. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सलग दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर थ्रोसह सुवर्णपदकावर नाव कोरले तर ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह कांस्यपदक जिंकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR