23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रनेत्याला पक्षात घेऊन संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत

नेत्याला पक्षात घेऊन संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत

नागपूर : प्रतिनिधी
एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन संपवायचे ही भाजपची परंपरा झाली आहे. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश याच प्रक्रियेचा भाग असल्याची खोचक टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

ते म्हणाले की, जर तुम्हाला माहिती होते त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने पक्ष पराभूत होणार आहे तर कशाला घेतलं? अशी विचारणा त्यांनी केली. इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर सामोरे जायचं आणि मग त्यांना संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीची पत्रकार परिषद तसेच बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला विजय वडेट्टीवार यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, बैठक कशासाठी आहे ते मला माहीत नाही. मला त्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे बैठकीचा अजेंडा मला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडून खोटा प्रचार करण्यात आलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, खोटारडेपणा कोणी केला? दहा वर्षे कोणी फसगत केली, संविधान बदलण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती? शेतकरी उद्ध्वस्त झाला याला कोण जबाबदार? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केले हा प्रचार खोटा कसा होऊ शकतो याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्यांनी सांगितले. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा यात्रा काढू, असेही ते म्हणाले. जिथे जिथे खोटे सांगण्याचा प्रयत्न करतील तिथे आम्ही खरे सांगण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक पक्षाला कामाला लागण्याचा अधिकार
दरम्यान भाजपच्या विधानसभा निवडणूक तयारीवर ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला कामाला लागण्याचा अधिकार आहे. सर्वांनी तशाच पद्धतीने आपापल्या पक्षाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR