25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींनी मागितलेली माफी राजकीयच

पंतप्रधान मोदींनी मागितलेली माफी राजकीयच

मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३० ऑगस्ट) वाढवण बंदराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी मालवणातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराजांची माफी मागितली. त्याशिवाय त्यांनी यावेळी शिवप्रेमींचीही माफी मागितली. पण त्यांच्या या माफीवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांनी मागितलेली माफी ही ‘राजकीय माफी’ असल्याचा टोला लगावला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या माफीवरून राज्यात वेगळे राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर भाष्य करत म्हटले की, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिले. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी शुक्रवारी राजकीय माफी मागितली. उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली, त्यामुळे ही फक्त ‘राजकीय माफी’ होती, असे टीकास्त्र राऊतांनी डागले.

तसेच, पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, आत्मीयता नाही, पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय आहे, या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी माफीचे पाऊल उचलले. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही. मोदींनी शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असे त्यांना वाटले असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR