21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली

अंकलखोप : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सतत खोटे बोलत आहेत. युवकांना नोक-या देतो, महागाई कमी करतो, अशी खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या १० वर्षांत महागाईचा उच्चांक झाला आहे. गरिबांना संपवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अंकलखोप (ता. पलूस) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते. यावेळी सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार गुजरातधार्जिणे असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. राज्यात कॉंग्रेस आघाडीशिवाय पर्याय नाही. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यांत पडत असेल तर भ्रष्टाचार किती फोफावला आहे हे लक्षात येते. एकीकडे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणायचे आणि दुसरीकडे आमच्या दैवताचा अपमान करायचा हे फक्त भाजपच करू शकते. दुष्काळ व महापूर काळात डॉ. विश्वजीत कदम जखमी असतानाही मदतकार्यात होते. लोकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचे काम फक्त कदम कुटुंबीयच करू शकतात.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळणार नाही या गैरसमजातून काही लोक बाजूला गेलेले असतात, त्यांना सन्मानाने पक्षात परत सामील करून घेतले जात आहे. अंकलखोपच्या सरपंचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

बदल्यांसाठी पैसे द्यावे लागताहेत
पटोले म्हणाले, राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत, त्यांचा तपास लागत नाही हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्या बदल्यांसाठी पैसे द्यावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR