जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी हा महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आता आपापले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली. कार्यकर्ता मेळावे असतील किंवा महिला मिळावे असेल, लाडके बहीण योजना संदर्भातील माहिती मेळावे असतील, सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. आता आगामी २५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदी कार्यक्रमानिमित्त महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौ-यासाठी भाजप पूर्ण तयारीला लागले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा होता, शासनाने तयारी सुरु केली होती. विमानतळाच्या समोरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र, दोन वेळा काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव जिल्हा दौरा होऊ शकला नाही. आता २५ ऑगस्ट रोजी ते जळगावात दाखल होणार आहेत.