नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ कलमाचा अर्थ उलगडून सांगितला. या कलमाच्या अंतर्गत पतीवर विवाहाअंतर्गत छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पत्नीला आहे. पण, हा गुन्हा दाखल करत असताना पतीच्या प्रेयसीला किंवा त्याच्याबरोबर राहणा-या महिलेला सहआरोपी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर. गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. याचिकाकर्त्या महिलेने हा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कलम ४९८ अ मधील तरतुदीनुसार पतीची प्रेयसी ही ‘नातेवाईक’ म्हणून गणली जात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ‘एक प्रेमिका इतकंच नाही तर महिलेशी पुरुषाचे विवाहबा रोमँटीक किंवा लैंगिक संबंध असतील तर त्या महिलेला नातेवाईक समजता येणार नाही’, असे न्यायालयाने सांगितले. त्याचबरोबर त्या महिलेने पत्नीला त्रास दिल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.
हा निकाल देत असताना ‘यू. सुवेथा वि. पोलीस निरीक्षक आणि अन्य (२००९)’ या खटल्यातील निकालाचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिला. पतीशी रक्ताचे संबंध किंवा दत्तक घेतल्याने निर्माण झालेल्या संबंधालाच ‘नातेवाईक’ म्हणून समजले जाईल, असे न्यायालयाने त्या निकालात स्पष्ट केले होते.
या प्रकरणात होणा-या छळाला कंटाळून काही पुरुषांनी आत्महत्या केली आहे. बंगळुरुमधील ‘एआय’ इंजिनिअर अतुल सुभाष यांनीही पत्नी आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या खोट्या तक्रारीनंतर जीव दिला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वीच एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान कलम ‘४९८ अ’ च्या दुररूपयोगावर चिंता व्यक्त केलीय.