30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकव्याप्त काश्मिरप्रश्नी भारत आक्रमक; चीन-पाकमध्ये खलबते

पाकव्याप्त काश्मिरप्रश्नी भारत आक्रमक; चीन-पाकमध्ये खलबते

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या तणाव सुरु आहे. दुसरीकडे भाजप सरकारमधील नेत्यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. पीओके आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत मुद्दा बनला आहे. भारतात पीओके बाबत वक्तव्य होऊ लागल्याने पाकिस्तान सरकार तणावात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार हे चीनच्या दौ-यावर गेले आहेत. चीनकडे त्यांनी काश्मीरबाबत मदतीचे आवाहन केले. आता पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचे कळते. चीनने पाकिस्तानला सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर किंवा ‘सीपीइसी’च्या ‘अपग्रेडेड व्हर्जन’ला प्रोत्साहन देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. पीओकेमधून जाणा-या सीपीईसीला भारताचा कडाडून विरोध आहे.

इशाक दार म्हणाले की, दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की काराकोरम महामार्ग चीन आणि पाकिस्तान यांच्यातील भौगोलिक कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा ‘सीपीईसी’चा एक महत्त्वाचा भाग आहे.’ हा काराकोरम हायवे पाकव्याप्त काश्मिरमधून जातो ज्याला भारताने विरोध केला होता. पण त्यानंतर ही तो बांधण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडतेच्या सुरक्षेला चीनचे पूर्ण समर्थन असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेला चीनचा पाठिंबा आहे.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा भारताच्या पंतप्रधानांपासून, गृहमंत्री ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरपर्यंत सर्वांनीच पीओकेबाबत दबाव वाढवला आहे. पीओकेमध्ये बराच हिंसाचार झाला असून तो दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

वांग यी आणि इशाक दार यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या धोरणात्मक संवादात भाग घेतला. ते म्हणाले की, चीन आणि पाकिस्तान एकमेकांना पाठिंबा देतील आणि सामरिक भागीदारीसाठी एकत्र काम करतील. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ज्या मुद्द्यांवर एकमत झाले होते त्या मुद्द्यांवर चीन पाकिस्तानसोबत काम करण्यास तयार असल्याचे वांग यी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR