आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार, ७ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये लष्कराविरुद्ध आता पश्तून लोकांनी बंडखोरी केली आहे. शुक्रवारी हजारोंच्या संख्येने पश्तून लोकांनी अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तान लष्कराच्या विरोधात आंदोलन केले. पाकिस्तान लष्कराकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनकर्त्यांवर पाक लष्कराने गोळीबार केला. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर अन्य काही जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा भागात दहशतवादाच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराकडून हिंसक ऑपरेशन सुरू आहे. पाक लष्कर दहशतवादाच्या नावाखाली पश्तून लोकांना त्रास देत होते. या कारवायांना त्रासलेल्या सामान्य नागरिकांनी आज आंदोलन केले. अफगाणिस्तान सीमेपासून ४० किलोमीटर दूर बन्नू येथे एका रॅलीत १० हजारहून अधिक लोक हातात पांढरे झेंडे घेत शांततेच आंदोलन करत होते. याच परिसरात सोमवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने विस्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या एका घरात घुसवले होते. ज्यात ८ पाकिस्तानी जवान ठार झाले होते.
गेल्या २० वर्षापासून पाक लष्कराचे आंदोलन सुरू आहे. तरीदेखील शांतता प्रस्थापित झाली नाही. पाकिस्तान लष्कराकडून या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तान सीमेजवळ नवे ऑपरेशन सुरू करण्यात आले. शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि काहींनी लष्करी तळावर दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाक लष्कराने गोळीबार केला. यात ७ जण ठार तर अनेकजण जखमी झाले.
बांगला देशातदेखील
आरक्षणावरून हिंसाचार
ढाका : बांगला देशात आरक्षणाचा वाद पेटला असून, यावरून आज हिंसाचार उसळला. देशभरात आंदोलन सुरू झाले असून, या आंदोलनात आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या पाच भारतीय राज्यांशी बांगला देशाची सीमा लागून आहे. त्यामुळे या भागात बंदोबस्त तैनात केला आहे. हे प्रकरण २०१८ चे आहे. त्यावेळीही यावरून आंदोलन झाले होते. पोलिसांनीही विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केल्याने वाद चिघळला आहे.