इस्लामाबाद : वृत्तसंस्था
बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानातही सरकारविरोधात बंडाची ठिणगी पडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सरकारला अल्टिमेटम देखील देण्यात आला. बांगलादेशनंतर पाकिस्तानात अराजकता माजणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पाकिस्तान स्टुडंट फेडरेशनने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ३० ऑगस्टपर्यंत सुटका करण्याची मागणी केली. यासाठी स्टुडंट फेडरेशनने पाकिस्तान सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान हे निर्दोष असून त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता पाकिस्तानात देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. पाकिस्तान स्टुडंट फेडरेशनची (पीएसएफ) इम्रान खान यांना त्वरीत तुरुंगातून बाहेर काढण्याची मागणी केली. बांगलादेशच्या आंदोलनानंतर पाकिस्तानी तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही मानले जाते.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका न केल्यास आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास पाकिस्तानमध्ये देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा पीएसएफने सरकारला दिला. या आंदोलनांमुळे पाकिस्तानमध्ये सुरू असलेला राजकीय तणावही लक्षणीय वाढणार आहे. पीएसएफच्या इशा-यानंतर सरकार काही मोठी कारवाई करू शकते.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून मोठी घोषणा केली आहे. ९ मेच्या दंगलीबाबत पीटीआयवरील आरोप सिद्ध झाल्यास माफी मागण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.