23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeसोलापूरपायाभूत चाचणीच्या पेपरची होणार तपासणी

पायाभूत चाचणीच्या पेपरची होणार तपासणी

सोलापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील ६० शाळांचा अहवाल दिला आहे. यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाला जाग आली आहे. आता पायाभूत चाचणीच्या पेपरची तपासणी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून होणार आहे.

पायाभूत चाचणीचे पेपर पर्यवेक्षीय यंत्रणेकडून १० टक्के तपासणी होणार आहे. तपासणीचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेने गतवर्षापासूनच घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागामधील गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या शाळांसाठी विविध चांगले निर्णय घेत आहेत. त्यांनी शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीनिहाय तपासण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट ही परीक्षा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या कार्यालयामार्फत आयोजित केली जाते.

त्यामध्ये पायाभूत चाचणी संकलित एक व संकलित दोन या परीक्षा घेतल्या जातात.
मागील शैक्षणिक वर्षात संकलित चाचणी दोन परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये अनेक शाळांची गुणवत्ता घसरल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एकूण ६० शाळांना भेटी देऊन संकलित चाचणी दोन पेपर तपासणी शिक्षकांकडून कशा प्रकारे केली आहे. याची पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पेन्सिलने उत्तर लिहणे, शिक्षकांनी पेन्सिलने पेपर तपासणी करणे, काटेकोरपणे गुणदान न करणे, उत्तरे खाडाखोड करून पुन्हा लिहिणे, व्याकरणदृष्ट्या चुकीच्या वाक्यांना गुण देणे या बाबी निदर्शनास आल्या आहेत.

पॅट चाचणी पेपर इयत्ता तिसरीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांनी पेनने लिहिणे, चाचणी पेपर शिक्षकांनी लाल पेनने तपासणे, सर्व पेपर वस्तुनिष्ठपणे तपासणे, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दहा टक्के पेपर तपासणीची फेर पडताळणी करणे, पेपर तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे. अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षकांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR