19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपिपाणी, तुतारी चिन्हे गोठवले

पिपाणी, तुतारी चिन्हे गोठवले

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह कायम

मुंबई : पक्षात पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह दिले होते. तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्याच शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवले आहे. तर पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह लढणा-या उमेदवारांविरोधात काही उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह मिळाले होते. दोन्ही चिन्हांमध्ये ब-यापैकी साम्य असल्याने काही ठिकाणी त्याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. त्यामुळे पिपाणी चिन्हाविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे. त्याबरोबरच केवळ तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णयही निवडणूक आयोगाने घेतला आहे.

याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या चिन्हांच्या यादीमध्ये ट्रम्फेट नावाचे एक चिन्ह होते, त्याचे मराठीमध्ये तुतारी असे भाषांतर करून ते चिन्हाखाली लिहिण्यात आले. तसेच त्या तुतारीचा प्रचार झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ब-याच मतदारसंघात आम्हाला फटका बसला. एका मतदारसंघाच या चिन्हाला ३४ हजार मते पडली आणि तेवढ्याच मतांनी आमचा उमेदवार पराभूत झाला. दिंडोरीमध्ये या चिन्हाला १ लाख ३ हजार मते पडली. लोकांच्यात नसणा-या उमेदवारांना एवढी मते पडू शकत नाहीत. याचा परिणाम आमच्या निवडणुकीवर होऊ शकतो. म्हणून आम्ही याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने १६ जुलै रोजी एक आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये पिपाणी आणि तुतारी ही चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR