23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुणेरी बिबट्यांना मिळणार गुजराती ‘पाहुणचार’

पुणेरी बिबट्यांना मिळणार गुजराती ‘पाहुणचार’

पुणे : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये उद्योगधंदे गुजरातला पळवले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या मुद्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

तर आता त्यांच्याच मतदारसंघातील शंभर बिबटे गुजरातला घेऊन जाणार असल्याचे समोर आल्यानंतर या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमांवर याबाबतची माहिती देणारी पोस्ट टाकली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने अधिक दिरंगाई न करता बिबटप्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे व बिबट प्रजनन नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे. जुन्नर वन उपविभागातील १०० बिबटे गुजरातला नेणार अशी माहिती मिळाली. मानव-बिबट संघर्षावर केलेला हा उपाय स्वागतार्ह असला तरी अगदीच तात्पुरता आहे.

या भागांमध्ये ७०० हून अधिक बिबटे असताना फक्त १०० बिबटे हलवल्याने परिस्थितीमध्ये फारसा काही फरक पडणार नाही,
बिबट्यांच्या प्रजननाचा वेग पाहता काही बिबटे गुजरातला हलवून आज कमी होणारी संख्या भविष्यात कधीतरी वाढणारच आहे. बिबट प्रजनन नियंत्रण व राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करणे हाच या समस्येवर शाश्वत उपाय आहे. याबाबतीत मी स्वत: अनेकदा संसदेत भूमिका मांडली आहे, केंद्रीय वन मंत्री, केंद्रीय वन महासंचालक यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली आहे, त्यांच्या सूचनेनुसार काही महिन्यांपूर्वी जुन्नर वन उपविभागाने महाराष्ट्र सरकारकडे बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्तावही सादर केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या दिरंगाईमुळे जुन्नर वन उपविभागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मानव-बिबट संघर्ष तीव्र होत आहे. मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सदर बाबीचा गांभीर्याने विचार करत लवकरात लवकर बिबट प्रजनन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात व बिबट प्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे, अशी आमची मागणी आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR