लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. १४ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कै. ग्यानबा शिवराम कोटंबे बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, हिंपळनेर निर्मित व श्याम पेठकर लिखीत आणि प्रदीप भोकरे दिग्दर्शित ‘पुरुष गाळणा-या बायकांचा गाव’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. पंधरा, वीस कलावंतांनी मन लावून नाटकाला छान आकार दिला.
पायाला भिंगरी बांधून, भटकंती करीत निघालेला एक बैरागी, वाटेवरच्या त्या शापित गावात थांबतो. त्या मातीच्या दु:खाशी नाते जोडीत पुरुष गाळणा-या बायकांच्या त्या गावात शापमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. सर्वच पातळ्यांवरील मोह, असुया, आसक्त्ती, सूड हे नाकारीत निर्मळ शांतीच्या मार्गाने मोक्षाची पायवाट सापडते, हे दाखवित पुन्हा मार्गस्थ होतो, अशा अनेकविध प्रतिकांचा अंगीकार करीत हे नाटक उंचीवर जाते.
पडदा उघडतो. एका कोप-यात थरथरणारा कुबडा (रावसाहेब-ऋतुराज सुरवसे) बसलेला आहे. तेवढ्यात बैरागी (रवी आघाव) प्रवेशतो. हा कोण?, शापीत गावात का आला. या विचाराने थरथरणा-या कुबड्याचा अधिक थरकाप होतो. बैरागी आणि कुबडा यांच्यात शाब्दीक जुगलबंदी दिग्दर्शक प्रदीप भोकरे यांनी अतिश्य चांगल्या प्रकारे रंगवली. रवी आघाव याने बैरागी तर रावसाहेब सुरवसे याने साकारलेला कुबडा चांगलाच झाला. आनंद सरवदे (बुटका) यांनी खुप छान पद्धतीने भूमिका रंगवली. लक्ष्मण वाघमारे यांनी महाराज, श्रीनिवास बरीदे यांनी वीरभद्र, विजयकुमार घोलप यांनी असुरभद्र छानच साकारला. गणेश बेळंबे यांची गुरुजींची भूमिकाही ब-यापैकी होती. नारायण हाके(बासरीवाला), चेतना जैन, हिरा वेदपाठक, नेहा मस्के, योगिता जाधव, स्नेहा पांचाळ यांनी स्त्रीयांच्या भुमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मल्लेश्वर कोटंबे, नारायण हाके, व सागर गुंडाळे यांनी पुरुषांची भुमिका साकारल.ी.
या नाटकाची संहितेला हाताळने तसे खुप कठीण परंतु, प्रदीप भोकरे यांनी संहितेतील बारकाव्यांचा लक्षपुर्वक विचार करुन नाटक उभे केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी खुप मेहनत घेतल्याचे जाणवते. मल्ल्लेश्वर कोटंबे यांचे नेपथ्य खुपच भव्य-दिव्य होते. त्याला जितेंद्र बनसोडे यांच्या प्रकाशयोजनेने साज चढवला. प्रा. गणेश बेळंबे यांची वेशभूषा आणि रंगभुषा नाटकाच्या गरजेनूसार होती. राजेश शिंदे यांच्या पार्श्वसंगीताने नाटकाला भारदस्तपणा आणला.