लातूर : प्रतिनिधी
अग्रसेन जयंतीचे औचित्य साधून रविवारी येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात १५५ जणांची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य शिबीरराचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोद्दार हॉस्पिटलचे संस्थापक, लातूरचे ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार, डॉ. मंगेश कुलकर्णी, अशोक अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, आनंद अग्रवाल, नीता अग्रवाल, महेश अग्रवाल, भावना पोद्दार, ममता अग्रवाल, नंदिनी ब्रिजवासी, राहुल अग्रवाल, श्यामसुंदर अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. समस्त अग्रवाल समाज बांधवांच्या वतीने या शिबिराच्या आयोजनाबद्दल अशोक (गट्टू) अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिरात हाडांचा ठिसूळपणा, किडनी फंक्शन, ब्लड शुगर तपासणी, रक्त तपासणी, रक्त्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार यांनी हाडांचे आजार बळावणार नाहीत यासाठी आतापासूनच प्रत्येकाने नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. या शिबिराचा अग्रवाल समाजातील एकूण १५५ स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. रुग्णांच्या तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारसाठीचे योग्य ते मार्गदर्शनही तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल समस्त अग्रवाल समाजाच्या वतीने पोद्दार हॉस्पिटल व सिट्रस डायग्नोस्टिक्सचे आभार मानण्यात आले.
फोटो: १