बीड : प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा केली आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असून, आज त्यांनी स्वामी समर्थ मंदिरात पूजा केल्यानंतर केज शहरामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाबद्दल विचारले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी असणार का? असा प्रश्न अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता. मात्र, आज स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, हा निर्णय खूप विचारांती प्रकाश आंबेडकरांनी घेतला असेल, म्हणून त्यांनी जो उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला तो योग्य असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. महादेव जानकर हे आमच्या युतीत होते आणि आता उमेदवारी पण जाहीर झाली आहे. महादेव जानकर यांना शुभेच्छा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
ज्योती मेटे निवडणूक लढवणार असतील तर तो त्यांचा निर्णय
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम हा भाजपचाच घटक पक्ष असल्याचे भाषणामध्ये सांगितले होते. त्यावेळी त्यांनी विनायक मेटे यांची आठवण पण करून दिली होती. मात्र, कालच शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी अशी भूमिका घेतली हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले. कारण, त्या सोबत आहेत हे मला माहीत होते. पण तरीही त्यांनी जर उमेदवारीचा निर्णय घेतला असेल तर शेवटी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे पंकडा मुंडे म्हणाल्या.