बंगळूर : अश्लील व्हिडिओच्या पेन ड्राईव्ह प्रकरणातील मुख्य आरोपी आणि परदेशात पळून गेलेले हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा बुधवारी भारतात येतील, अशी अपेक्षा करून विशेष तपास संस्था हतबल झाली आहे.
गेल्या २० दिवसांपासून प्रज्वल रेवण्णा एसआयटी अधिका-यांना हुलकावणी देत आहे. भारतात परतण्यासाठी ३ मे ते १५ मेपर्यंत बुक केलेल्या विमानाची पाच तिकिटे शेवटच्या क्षणी रद्द केली आहेत.
प्रज्वल रेवण्णावर ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात आली. आता प्रज्वल यांना भारतात आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करणे हा आहे. ‘रेड कॉर्नर नोटीस’ लागू करणे ही सोपी प्रक्रिया नाही. प्रज्वल यांना अटक न केल्याने फरार झाल्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहे. त्यानंतर न्यायालय आरोपींना खटल्याला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावेल. या प्रकरणात एसआयटी परदेशात लपलेल्या आरोपींची माहिती देईल.
न्यायालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास प्रज्वल यांचा शोध घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर एसआयटी ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची सीबीआयला विनंती करू शकते. त्यानंतर सीबीआय इंटरपोलच्या माध्यमातून ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करेल. या सर्व प्रक्रियेसाठी एसआयटीला किमान ४० दिवस लागतील.
गेल्या २० दिवसांपासून परदेशात पळून गेलेले प्रज्वल बुधवारी जर्मनीहून बंगळूर विमानतळावर पोचणार होते. एसआयटी अधिका-यांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या प्रतीक्षेत तळ ठोकला होता. जर्मनीतील म्युनिक येथून त्यांनी विमानाचे तिकीटही काढले होते. लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये प्रज्वल मध्यरात्री १२.३० च्या सुमारास येणार होते. त्यानंतर ब्रिटिश एअरलाइन्सच्या विमानातूनही प्रज्वल येतील, अशी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र दोन्ही फ्लाइटमझून प्रज्वल न आल्याने पोलिस रिकाम्या हाताने परतले.
‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ रद्द करता येत नाही
खासदार असल्याने प्रज्वल यांनी डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून परदेशात प्रवास केला. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणीही करण्यात आली, मात्र हा पासपोर्ट इतक्या सहजासहजी रद्द करता येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरच परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट रद्द करू शकते.