19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी महाराष्ट्राच्या हिताचे काम करावे

फडणवीसांनी महाराष्ट्राच्या हिताचे काम करावे

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा निवड झाली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, आता त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावे, अशा शब्दांत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत, ते कसे आलेत हे सगळ्यांना माहीत आहे.

आता फडणवीस यांनी फक्त लाडक्या बहिणींसाठी नाही, तर लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके बेरोजगार या सगळ्यांसाठी काम करावे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील यांचा अवघ्या २१०० मतांनी पराभव झाला.

दरम्यान, मतदानाच्यावेळी भाजपचे उमेदवार मंत्री अतुल सावे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात आले होते, याचा व्हीडीओ आणि इतर पुरावे इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. तसेच जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती.

या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात सावे यांनी पैसे वाटल्याचे सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. यावर इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, याबद्दल विचारले असता इम्तियाज जलील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ते करत असतानाच फडणवीसांनी आता समाजातील सगळ्या घटकांसाठी काम करावे, केवळ लाडक्या बहिणींसाठी नाही, असा चिमटा काढला. महाराष्ट्रात महायुती बहुमताने जिंकली. एकट्या भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १३२ आमदार निवडून आणले, ते कसे आले हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

पण आता ते मुख्यमंत्री होत आहेत, म्हटल्यावर त्यांचे नक्कीच अभिनंदन करावे लागेल. फक्त त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम, शेतक-याच्या मलाला भाव द्यावा, एवढीच अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR