लोकसभा निवडणुकीच्या सातव्या फेरीच्या मतदानानंतर देशातील जवळपास सर्वच एक्झिट पोलनी भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ ३५० च्या वर जागा जिंकून आरामात तिस-यांदा सत्तेवर येण्याचे अंदाज वर्तविले होते. याचाच अर्थ काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडी पुन्हा एकवार मोदींना रोखण्यात वा त्यांचा प्रभाव कमी करण्यात अपयशी ठरल्याचा अंदाज हे एक्झिट पोल व्यक्त करत होते. मात्र त्या वेळी ‘एकमत’ने ‘क्लायमॅक्सची प्रतीक्षा’ या ‘संपादकीय’मधून या निवडणुकीच्या एक्झॅक्ट निकालांची प्रतीक्षा करावी लागेल, असे मत व्यक्त केले होते. त्यामागे सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी कुठलीच लाट निर्माण करण्यात वा एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेले अपयश हा आमचा तर्क होता. त्यामुळे जरी भाजप आघाडीने २७२ चा बहुमताचा आकडा गाठला तरी अनेक धक्कादायक निकालांमुळे भारतीय राजकारणाच्या मागच्या १० वर्षांच्या राजकीय स्थितीत मोठा उलटफेर होईल, असा आमचा तर्क होता.
मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यापासून क्षणाक्षणाला हा तर्क खरा ठरत असल्याचा प्रत्यय येत होता. भाजपसाठी अत्यंत भरवशाच्या मानल्या जाणा-या उत्तर प्रदेश व त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीने रालोआला जो जबरदस्त धक्का दिला त्याने भाजपच्या मोठ्या बहुमतासह तिस-यांदा सत्ता स्थापनेचा फुगा पुरता फुटला. भाजपला स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यापासून रोखण्यात ‘इंडिया’ आघाडीने विशेषत: काँग्रेसने रोखले आहे. काँग्रेसने भाजपला दिलेल्या जोरदार दणक्याने मागच्या निवडणुकीत एकट्याने ३०३ जागांवर विजय प्राप्त करणारा भाजप २५० जागांच्या आत आला आहे. तर काँग्रेस ९९ जागांवर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीने रालोआला दणका देताना चाळीशी पार केल्याने भाजप थेट तिशीत पोहोचला. यामुळे रालोआ या निवडणुकीत ‘चारसौ पार’ तर लांबच पण ‘तीनसौ पार’ होतानाही अडखळत, धडपडत असल्याचेच दिसते आहे.
सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजप २३९ जागांवर तर रालोआ २९३ जागांवर आघाडीवर होती. तर काँग्रेस ९९ जागांवर व इंडिया आघाडी २३२ जागांवर आघाडीवर होती. तेलगू देसम्ने ३० जागांवर आघाडी घेतली होती. तेलगू देसम् व नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल रालोआ आघाडीत आहे. मात्र संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर जर राष्ट्रीय पातळीवरही महाराष्ट्राप्रमाणेच भाजपला सत्तेतून दूर करण्याचा प्रयत्न झाला तर त्या वेळी चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे. अशा वेळी भाजपला सरकार स्थापनेसाठीच्या साध्या बहुमतासाठीही धावाधाव करण्याची वेळ येऊ शकते. थोडक्यात ‘अब की बार चारसौ पार’ चा नारा देऊन व ‘मोदी की गॅरंटी’ देऊन भाजपने जो फुगा निवडणुकीत फुगविला होता त्याला ‘इंडिया’ आघाडीने जोरदार टक्कर देत पुरती टाचणी लावली आहे. भाजपचे सर्र्वांत जास्त वस्त्रहरण झाले आहे ते महाराष्ट्रात ! मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या साक्षीने ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळविणारा भाजप राज्यात केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतरही या निवडणुकीत स्वत: १० जागांवर सीमित झाला आहे.
याचाच अर्थ महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या व सूडाच्या राजकारणाला साफ नाकारले आहे. एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या बंडखोेरीला व पक्षावर ताबा मिळविण्याच्या कृत्यालाही मतदारांनी अजिबात थारा दिला नाही. निवडणूक एकतर्फी नव्हे तर अत्यंत अटीतटीची झालीय व ‘इंडिया’ आघाडीने भाजपच्या सर्व फंड्यांवर मात करून भाजपचे पुरते गर्वहरण केले असल्याचे मतमोजणीतील चुरशीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच देशातील सर्व जागांचे अंतिम निकाल येण्यास अपेक्षेपेक्षा जास्त उशीर होऊ शकतो. तथापि सध्या तरी कुठले राजकीय उलटफेर घडले नाहीत तर ‘इंडिया’ आघाडी भाजपला सत्तेवरून दूर करण्यास मात्र यशस्वी ठरली नसल्याचे मान्य करावे लागते. मात्र त्याच वेळी ‘इंडिया’ आघाडीने भाजपचे पुरते गर्वहरण करून त्यांना जमिनीवर आणले आहे हेही तेवढेच खरे! त्यामुळे मोदी-शहा या भाजपच्या अजेय मानल्या जाणा-या जोडीला केवळ रोखताच नव्हे तर पराभूतही करता येते हा आत्मविश्वास काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना प्राप्त झाला आहे.
त्यामुळे आता देशातील राजकारणाची दिशा येत्या काळात बदलणार आहे. अर्थातच त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल कारण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला पुरता धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे आपल्या समर्थकांना टिकविण्याचे कडवे आव्हान एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमोर आहे. तर आपल्या पक्षातील निष्ठावंतांची नाराजी दूर करण्याचे आवाहन भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात राजकीय उलटफेरीचा ‘तिसरा अंंक’ सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा येत्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणे अटळ आहे. थोडक्यात देशात व महाराष्ट्रातही जोरदार कमबॅक करून काँग्रेसने भाजपचे अत्यंत भक्कम वाटणारे सिंहासन डळमळीत केले आहे. काँग्रेसने या वेळी इंडिया आघाडीच्या ऐक्यासाठी मोठ्या त्यागाची भूमिका घेत देशभरात ३१८ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी अशी भूमिका घेऊन काँग्रेस भाजपला सत्तेवरून पायउतार कशी करेल? अशी शंका राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त झाली होती.
त्यात नक्कीच तथ्य असल्याचे निकालातून दिसून आले. मात्र ज्या ३१८ जागा काँग्रेसने लढविल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. कारण त्यातील बहुतांश जागांवर काँग्रेसची थेट भाजपशी लढत होती व याच जागा भाजपचे स्वबळ घटविण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. ३०३ वरून २३९ जागांवर आलेला भाजपा व ५३ वरून ९९ जागांवर पोहोचलेली काँग्रेस पाहता काँग्रेसने आपली कामगिरी अत्यंत चांगल्या प्रकारे बजावून भाजपचा फुगा पुरता फोडला, असेच म्हणावे लागेल. रालोआच्या साधारण बहुमतासह भाजपने केंद्रातील सत्ता टिकविली तरी या तिस-या टर्ममध्ये आज भाजपसमोर संख्याबळाने व आत्मविश्वासानेही भरपूर असलेल्या विरोधकांचे कडवे आव्हान आणि अंकुश असणार आहे. देशातील मतदारांनी सजगतेने मतदान करून लोकशाहीत हव्या असलेल्या सशक्त विरोधकांच्या अंंकुश निर्मितीला बळ दिले त्याबद्दल मतदारांचे अभिनंदन करावे लागेल हे मात्र निश्चित!