परभणी : बांगलादेशात हिंदू समाज बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणच्या हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात येत आहे. इस्कॉन मंदिराचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी यांना बेकायदेशीरपणे अटक करून कारागृहात डांबण्यात आले असून त्यांची तात्काळ सुटका करण्यासह बांगलादेशातील हिंदू बांधवांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज बांधवांनी मंगळवार, दि.१० रोजी शहरातून विराट मोर्चा काढला.
शहरातील शनिवार बाजार येथून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील मैदानात पोहचला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना यांना निवेदन पाठवत बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या घटनांचा संत, महंतांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून हिंदू महिला, युवतीवर अमानवीय अत्याचार होत आहेत. याबाबत भारत सरकारने जागतिक स्तरावर आपले मत स्पष्ट करून आंतरराष्ट्रीय समुदाया याबाबत जागृत करावे. बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत. बांगलादेशात हिंदूवर होत असलेले अत्याचार त्वरीत बंद होतील अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संत, महतांसह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या संरक्षणार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरूवात सकाळी १० वाजता शनिवार बाजार येथून करण्यात आली. या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरीकांनी सकाळ पासूनच या ठिकाणी गर्दी केली होती. शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील उपोषण मैदानात पोहचला. या ठिकाणी उपस्थित संत, महंतानी उपस्थित सकल हिंदू समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या मोर्चात महिला लाल, पिवळ्या साड्या परीधान करून तर पुरूष भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. यावेळी बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडण्यात आला होता. सकल हिंदू समाज बांधवांनी काढलेल्या या विराट मोर्चाने शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.