लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसाार गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी बाभळगावातील शेतरत्याच्या कामाचा आढावा घेतला.
शेती आणि शेतक-यांच्या प्रगतीत शेतीला जोडणारा रस्ता महत्त्वाचा असतो कारण शेतीचे यांत्रिकीकरण सध्या मोठ्या प्रमाणात झाले आहे. या अनुषंगाने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकतीच बाभळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लातूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक घेऊन बाभळगाव येथील शेतरस्त्या संदर्भात विविध सूचना केल्या होत्या. शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी बाभळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी बाभळगावातील शेतरस्त्याच्या कामाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत बाभळगावातील विविध शेतक-यांनी शेतरस्त्याविषयी अडचणी मांडल्या. गटविकास अधिकारी तुकाराम भालके म्हणाले की, शेतरस्त्यांची कामे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
बाभळगावातील बरेच शेतरस्ते सध्या अतिक्रमणमुक्त्त आहेत. त्या रस्त्यांची नोंद घेऊन त्याचा प्रस्ताव मजबुतीकरणासाठी तयार करावा. जे रस्ते नकाशावर आहेत परंतु त्यावर अतिक्रमण आहे असे रस्ते गाव कमिटी नेमून त्याद्वारे किंवा लातूर तहसील कार्यालयांच्या मध्यस्थीने अतिक्रमणमुक्त्त करुन घ्यावेत. जे शेतरस्ते नकाशावर नाहीत परंतु ते रस्ते शेतक-यांच्या संमतीने होणार आहेत, अशा रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी बाभळगावच्या सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, ग्रामसेवक अनंत मडके, तलाठी गोविंद तावरे, मनरेगाचे अभियंता सुनील श्रगारे, अनिल मरके, रामचंद्र थडकर, भिमा शिंदे, युवराज थडकर, जीवनराव देशमुख, मोहन आयरेकर आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.