26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रबीएएमएस पदवीधर होणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी

बीएएमएस पदवीधर होणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी

मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर आयुर्वेद पदवीधारकांना (बीएएमएस) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध शासकीय आरोग्य आस्थापनात नियुक्त करण्यात येणार आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हजारो आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतील कामकाज आणि लाखो सर्वसामान्य जनता, रुग्ण यांना आरोग्य सेवा मिळण्यात मोठी अडचण होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी गट ब ची भरमसाठ पदे रिक्त आहेत. राज्यात ब-याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वच आरोग्य आस्थापनात अशीच स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात जीआर जारी केला असून, बीएएमएस पदवीधरांची कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नियमित नियुक्त्या होईपर्यंत पर्यायी वैद्यकीय अधिकारी नेमण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने (खात्याने) नियमित नियुक्त्या होईपर्यंत आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना कंत्राटी व वैद्यकीय अधिकारी ( गट ब) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील निर्गमित केला. सार्वजनिक आरोग्य सेवा मंत्रालयाचे अवर सचिव महेश लाड यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता बी ए एम एस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेद व अलोपॅथी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरती आरोग्य पथके, दवाखाने यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील पद कंत्राटी पद्धतीने आणि आयुर्वेद पदवीधरमधून भरण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २० डिसेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील अटी आणि शर्तीला अनुसरून या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

अधिकारी उपलब्ध
होईपर्यंत नियुक्ती
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बीएएमएस अर्हताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

रिक्त जागेवर मिळणार
आता वैद्यकीय अधिकारी
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रत्येक रुग्णालयाला आता वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे. तसेच आरोग्य सेवा विषयक प्रशासकीय कामकाजावरील ताण कमी होऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. यातून बीएएमएस पदवीधर उमेदवारांना आर्थिक स्थिरता आणि आरोग्य सेवेचा अनुभवही मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR