23 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?

बीडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?

४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा कार्यकर्त्यांच्या लागल्या पैजा

बीड : बीडमध्ये गुलाल कोण उधळणार हे समजण्यासाठी १७ दिवसांची अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत चर्चेला ऊत आला आहे. निकाल काय असणार याबाबत चौकाचौकात चर्चा सुरू आहेत. त्यासोबतच अनेकांच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात बैठका, मेळावे, पदयात्रा, रॅलीने सर्व कार्यकर्त्यानी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत होता, त्याप्रमाणात धुरळा उडत गेला. सोमवारी बीड जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान पार पडले. त्यासाठी दिसवसभर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राबत होते. त्यादिवशी मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह जाणवत होता. आता मतदानाच्या आकडेवारीवरून विविध अंदाज बांधले जात आहेत.

बीड मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या ठिकाणी महायुतीकडून माजी मंत्री पंकजा मुंडे या रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनावणे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.
बीड लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी झालेल्या निवडणुकीत सोमवारी चुरशीने मतदान झाले. याठिकाणी जवळपास ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच निकालाची आतुरता लागली आहे.

बीडमध्ये या निवडणुकीत लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसले. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरात चर्चा सुरू आहे. दुसरी गोष्ट भाजपची यंत्रणा निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसली. त्यामुळे या निवडणुकीत कमळ की तुतारी बाजी मारणार यावर अनेक पैजा लागल्या आहेत.

परळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान
जिल्ह्यातील मुंडे बंधू-भगिनींचे होम पीच असलेल्या परळी मतदारसंघात जवळपास ८० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. या ठिकाणी भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत होती. याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कमळ की तुतारी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR