बुलडाणा : वृत्तसंस्था
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमधील अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास होऊ लागला होता. काही दिवसांत टक्कल पडल्यामुळे या प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आधी दूषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अभ्यासानंतर यामागील खरे कारण समोर आले आहे. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या अभ्यासानुसार विषारी तत्त्व असलेला गहू खाल्ल्यामुळे केस गळती झाल्याचे समोर येत आहे. रेशन दुकानांवरून वाटण्यात येणारा गहू यासाठी जबाबदार असल्याचे डॉ. बावस्कर यांनी अनेक महिने संशोधन केल्यानंतर सांगितले. या गव्हात सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तर झिंकचे प्रमाण अत्यल्प आहे.
डॉ. बावस्कर म्हणाले की, शेगाव येथे आढळलेल्या गव्हामध्ये इतर ठिकाणच्या गव्हाच्या पिकाच्या तुलनेत सेलेनियमचे प्रमाण ६०० पट अधिक आढळून आले आहे. सेलेनियमचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे अलोपेसिया (टक्कल) आजाराची अनेक प्रकरणे याठिकाणी घडली आहेत. शेगावमधील गावांमध्ये अलोपेसियाची लक्षणे दिसल्यानंतर तीन ते चार दिवसांत डोक्यावर संपूर्ण टक्कल पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
डॉ. बावस्कर यांनी १८ बाधित गावांतील गव्हाचे नमुने ठाण्यातील व्हर्नी अॅनालिटकल प्रयोगशाळेत पाठवले होते. यामध्ये प्रति किलो गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण १४.५२ मिलिग्रॅम इतके आढळून आले आहे. सेलेनियमचे सामान्य प्रमाण किलोमागे १.९ मिलिग्रॅम असायला हवे. त्यापेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. बाधित गावांतील गहू पंजाबमधून आल्याचेही डॉ. बावस्कर यांनी सांगितले.
रक्त, मूत्र आणि केसांच्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचे प्रमाण अनुक्रमे ३५ पट, ६० पट आणि १५० पट आढळून आले आहे. यावरून असे दिसून आले की, अधिक प्रमाणात सेलेनियमचे सेवन केल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवली. तसेच बाधित लोकांमध्ये झिंकचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे आढळून आले असल्याचेही डॉ. बावस्कर म्हणाले.