सोलापूर : पोलीस दलातील विहीत शिस्तीस जाणीवपूर्वक छेद देऊन पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, असे बेकायदेशीर कृत्य करुन बेशिस्तीचं वर्तन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पोलीस शिपाई /१५९४ काशिनाथ विष्णुपंत वाडेकर ऊर्फ बापू वाडेकर ( ने. पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर) याला निलंबीत केले. ‘कर्तव्यात कसुरीला, माफी नाही’ जणू असंच या कारवाईनं दाखवून दिलं आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत, ११ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयात शहरातील मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. शिवजन्मोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी या बैठकीत पोलीस आयुक्तालयाकडून काही सूचना करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मुद्द्यावरही चर्चा झाली होती. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यावर जयंती साजरी करावी, असं आवाहन केलं होतं.
त्याचवेळी डीजे बेस लावायचे असतील तर ते दोनच लावले पाहिजेत. तसेच त्याच्या आवाजावर मर्यादा घालून देण्यात आल्या होत्या. चार हुतात्मा चौकात शिवप्रकाश प्रतिष्ठानच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्या ठिकाणी जयंती उत्सवाच्या दिवशी जागेवर लावलेल्या बेसवर वाजत असलेला आवाज अमर्यादित असल्याने पोलिसांनी तशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या.त्यावर पोलिस दलात सेवेत असलेले काशिनाथ विष्णुपंत वाडेकर या पोलीस शिपायाने दिलेल्या चिथावणीवरून त्या मंडळाचे गणेश वानकर व अन्य कार्यकर्त्यांना आवाज ठेवलाच पाहिजे, आवाज नसेल तर मिरवणूक पुढे घेऊन जाऊ नका, असा चिथावणीखोर सल्ला दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले.
त्यापूर्वी ०२ जून २०२३ रोजी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरामध्ये पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपत्री शिवाजी महाराज चौकातून मेकैनिक चौक-सरवस्ती चौक-रेवणी मारुती मार्गे शिवस्मारक मैदानपर्यंत पालखी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीस पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. त्यावेळी वाडेकर याला पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण त्या पालखी मिरवणुकीत सामिल होऊन लेझीम खेळून पोलीस खात्याचे शिस्तीस बाधा येईल, असे कृत्य केलेले होते.
पोलीस मुख्यालय समोर शिवराम प्रतिष्ठान आहे. तुम्ही तेथील रहिवाशी, राजकीय कार्यकर्ते यांना एकत्रित आणून शिवराम चौक या नावाचा बोर्ड तयार करुन सोलापूर महानगरपालिका अगर इतर संबंधित विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालय समोरील चौकात शिवराम चौक या नावाचा बोर्ड लावला असल्याचाही ठपका वाडेकर याच्यावर ठेवण्यात आलाय.पोलीस आयुक्तांनी शिस्त भंगाचा ठपका ठेवत पोलीस शिपाई काशिनाथ वाडेकर याच्यावर निलंबनाची कारवाई केलीय.