मुंबईत भाजयुमो कार्यकर्त्यांचा धुडगूस, खिडक्यांच्या काचा, खुर्च्यांची तोडफोड
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी किल्ला कोर्टसमोर असलेल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यालयासह खुर्च्या आणि कार्यालयातील इतर सामानांची तोडफोड केली. सोनिया गांधींसह कॉंग्रेस नेत्यांच्या फोटोंवर शाईफेक केली. तसेच पेवर ब्लॉकने कॉंग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लाठीचार्ज करीत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान, कार्यालय वाचविण्याच्या प्रयत्नात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिका-यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढत थेट कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाईफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडही मारले. तेथील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपच्या पदाधिका-यांनी झटापटही केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी देशभरात निषेध आंदोलन सुरू केले आहे. याला उत्तर देण्यासाठी भाजयुमो कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर जात घोषणाबाजी केली. कॉंग्रेसच्या कार्यालयात अशी घुसून हल्ला करणे अयोग्य आहे. आता भाजपच्या लोकांची थेट कार्यालयात घुसून हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. ही नवी पद्धत त्यांनी सुरू केली असून, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. भाजपाचा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर राग आहे. अमित शाह यांच्या भाषणातून तो राग व्यक्त झाला. त्याविरोधात आम्ही आंदोलन केल्याने या गोष्टी होत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
पोलिसांचा लाठीमार
काही वेळाने मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर दाखल झाला. त्यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच धरपकडही केली. लोकशाही पद्धतीने हे आंदोलन नसून पोलिसांच्या आडून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
भाजयुमो कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू
कॉंग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड करणा-या भाजयुमो कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासह इतरांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे भाजयुमोचे कार्यकर्ते अडचणीत आले आहेत.
हे तर भाजपने पोसलेले गुंड
भाजपाचे कार्यकर्ते नसून भाजपाचे पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केली आहेत, पण हातात दगड-गोडे घेतले नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्याला विरोध म्हणून काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला होत असेल, खुर्च्या फोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न असेल तर हे गंभीर आहे, असे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.