नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी उदासीनता आणि नागरिकांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे भारताच्या नावे एक विक्रम जमा झाला आहे, परंतु त्याचा अभिमान कुणालाही बाळगता येणार नाही. भारत आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश बनला आहे.
भारतात दरवर्षी ९३ कोटी टन इतका प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. जगातील सर्वाधिक म्हणजेच एक पंचमांश प्लास्टिकचा कचरा भारतात निर्माण होतो. याबाबतीत नायजेरिया दुस-या तर इंडोनेशिया तिस-या स्थानी आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ०.१२ किलो इतका कचरा भारतातील प्रत्येक व्यक्ती दरदिवशी तयार करतो.
जगातील एकूण प्लास्टिक कच-यापैकी ६९ टक्के कच-याच्या निर्मितीसाठी २० टक्के देश जबाबदार आहेत. २० पैकी ४ देश कमी उत्पन्न गटातील आहेत. ९ देश निम्न मध्यम उत्पन्न गटातील, ७ देश उच्च मध्यम उत्पन्न गटालीत आहेत. उच्च उत्पन्न गटातील देशही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या कच-याची निर्मिती करतात. परंतु यातील एकही देश प्लास्टिकचे प्रदूषण करणा-या देशांच्या यादीत नाही.
इंग्लंडमधील इप्सोस आणि ग्लोबल कॉमन अलायन्स यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात प्रत्येक पाच पैकी तीन व्यक्तींनी असे सांगितले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारकडून पुरेसे प्रयत्न केले जात आहेत. २० देशांमधील एक हजार जणांची मते या पाहणीत जाणून घेतली.
८०% भारतीयांना असे वाटते की, प्रदूषणाचे गंभीर नुकसान होण्यासाठी कारणीभूत ठरणारे लोक तसेच उद्योगसमूहांविरोधात कारवाई झाली पाहिजे. काही जणांना वाटते की, या ७३% टप्प्यावर प्रदूषण थांबवले नाही तर भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येणार नाहीत. स्थिती हाताबाहेर निघून जाईल.